

श्रीगंगानगर/श्रीकरणपूर; वृत्तसंस्था : पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या श्रीकरणपूर क्षेत्रातील चकर 23-ओ गावात पुन्हा एकदा अमली पदार्थांचा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. काल (गुरुवारी) सायंकाळी एका शेतातून अर्धा किलो हेरॉईन असलेला एक पॅकेट जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी देखील इतक्याच वजनाचा एक पॅकेट सापडला होता.
पोलिसांना संशय आहे की दोन्ही पॅकेटस् पाकिस्तानी तस्करांनी ड्रोनद्वारे टाकलेल्या मोठ्या खेपेचा भाग असावेत. शेतकरी ईश्वर सिंग यांना काल संध्याकाळी पाणी देत असताना हा संशयास्पद पॅकेट शेतात पडलेला दिसला. त्यांनी तातडीने माहिती दिल्यानंतर बीएसएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा माल ताब्यात घेतला.
जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 2.5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पॅकेटवर किंग माफिया नावाच्या टोळीचे शिक्के आढळले आहेत, जी पाकिस्तानमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जाते. पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा आता या भागात कसून तपास करत आहेत की, अलीकडच्या काळात पंजाबमधील कोणी या परिसरात आले होते का?