पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ (Kathua Encounter) येथील सुफेन जंगल भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी चकमक कायम राहिली. गुरुवारी झालेल्या चकमकीत ३ पोलीस शहीद झाले. तर या कारवाईदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक धीरज कटोच आणि इतर दोन पोलिस तसेच १ पॅरा स्पेशल फोर्सेसचा एक लष्करी जवान जखमी झाला. या परिसराची सुरक्षा दलांनी घेराबंदी केली असून, अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहे.
कठुआ येथे सुरू असलेल्या दहशतवादविरोधी ऑपरेशनदरम्यान 'सफियान' गावाजवळ जम्मू आणि काश्मीर दलातील काही पोलिस शहीद झाल्याची पुष्टी भारतीय लष्कराच्या 'रायझिंग स्टार कॉर्प्स'ने 'एक्स' वरील पोस्टमधून केली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या पोलिसांमध्ये एक हेड कॉन्स्टेबल आणि दोन कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. तर इतर दहशतवाद्यांना घेरले आहे. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मदच्या पीपल्स अँटी-फासिस्ट फ्रंट संघटनेचे असल्याची माहिती पुढे आली आहे. येथे गुरुवारी सकाळी सुरु झालेला गोळीबार संध्याकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी कायम राहिला. रात्री अंधार पडताच ही कारवाई थांबवण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा येथे चकमक सुरु झाली.
गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी कठुआतील साफियान गावाजवळ २७ मार्च रोजी संयुक्त शोध मोहीम सुरु केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती Rising Star Corps ने दिली आहे.
"गुरुवारी दिवसभर गोळीबार सुरूच होता," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ग्रेनेड आणि रॉकेटमुळे येथील परिसरात अनेक स्फोट झाले. या कारवाईदरम्यान जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कठुआ आणि जम्मू येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
२३ मार्च रोजी कठुआमधील हिरानगर भागातही अशीच कारवाई करण्यात आली होती. जम्मू-काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराच्या रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांच्या तुकडीने गुप्तचर माहितीवर आधारित येथे संयुक्त कारवाई सुरू केली होती.