नौदलाच्या ताफ्यात आणखी एक युद्धनौका

नौदलाच्या ताफ्यात आणखी एक युद्धनौका

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चीनसह पाकिस्तानच्या आगळिकीवर नजर ठेवण्यासाठी भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणखी एक विमानवाहू युद्धनौका दाखल होणार आहे. यासाठी 40 हजार कोटींचा खर्च येणार आहे. हिंदी महासागरात आपली ताकद वाढविण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. चीनच्या दादागिरीला शह देण्यासाठी नवीन विमानवाहू युद्धनौका बनविण्यात येणार आहे.

या युद्धनौकेचे वजन साधारणत: 45 हजार टन असणार आहे. कोचीन शिपयार्डमध्ये ही युद्धनौका बनविण्यात येणार आहे. या युद्धनौकेवर 28 लढाऊ विमानांसह एक हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहे. पाकिस्तानजवळ एकही युद्धनौका नाही. चीनजवळ दोन युद्धनौका आहेत. भारताकडे आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. स्वदेशी बनावटीच्या 'विक्रांत'च्या धर्तीवरच नव्या युद्धनौकेची रचना असणार आहे. लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर, उंची 59 मीटर असणार आहे. या युद्धनौकेचा वेग प्रतितास 52 कि.मी. असणार आहे. या युद्धनौकेला तयार करण्यासाठी साधारण दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.

समुद्रात तरंगती तुकडी

समुद्रात लवकरच तीन 'कॅरिअर बॅटल गु्रप' तैनात करण्यात येणार आहे. एकप्रकारे भारतीय संरक्षण दलाची ही समुद्रातील तरंगती तुकडीच असणार आहे. समुद्रात 400 कि.मी. अंतरापर्यंत अचूक लक्ष्य ठेवण्यासाठी ही तुकडी मदत करणार आहे. या टप्प्यात शत्रू राष्ट्राच्या हालचाली जाणवल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. या तरंगत्या कॅरिअरमध्ये लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे, रॉकेट, बॉम्ब आदींचा समावेश
असणार आहे.

क्षेपणास्त्र विध्वंसक 'इंफाळ'

भारतीय नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्र विध्वंसक 'इंफाळ' दाखल होणार आहे. शत्रू राष्ट्रांच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी 'इंफाळ'ची निर्मिती करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच 'इंफाळ'चे अनावरण केले. माझगाव शिपयार्डमध्ये 'इंफाळ'ची निर्मिती करण्यात आली आहे. महासागरातील चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी भविष्यात 175 युद्धनौकांच्या निर्मितीवर केंद्राच्या वतीने लक्ष केंद्रित करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news