पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात असलेल्या समर फील्ड स्कूलला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. गुरूवारी (दि.१ ऑगस्ट) रात्री उशिरा एका ई-मेलच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. त्यानंतर शाळा प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान तपासात काहीही निष्पन्न झाले नाही.
शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हा मेल गुरूवारी (दि.१ ऑगस्ट) रात्री 12.30 वाजताच पाठवण्यात आला होता. मात्र रात्री कार्यालय बंद असल्याने याबाबत कोणालाच माहिती मिळाली नाही. शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी शाळा उघडली असता ही माहिती समोर आली. शाळेत बॉम्ब ठेवल्याचे मेलमध्ये लिहिले होते. शाळा प्रशासनाने मेलद्वारे दिल्ली पोलिसांना माहिती दिली. शाळेत बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शाळा रिकामी करून तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत बॉम्ब ठेवल्याची बातमी अफवा वाटत असली तरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस मेल पाठवणाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत समरफिल्ड स्कूलच्या प्राचार्या शालिनी अग्रवाल सांगतात, 'आम्हाला रात्री उशिरा एक ईमेल आला, जो आज सकाळी तपासण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ईमेल मिळाल्यानंतर 10 मिनिटांच्या आत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. आम्ही या प्रकरणा संदर्भात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे.
दिल्लीतील शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तपासाअंती या पूर्णपणे अफवा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनीही याप्रकरणी पूर्ण दक्षता दाखवली असल्याची माहिती समोर आली आहे.