

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आंध्र प्रदेशावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. गेल्या तीन आठवड्यांत ‘अर्णब’ आणि ‘मुरासू’ या दोन चक्रीवादळांचा तडाखा बसल्यानंतर आता राज्याला ‘अक्वान’ या तिसऱ्या चक्रीवादळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता १७ नोव्हेंबरला वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. १९ नोव्हेंबरच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी पहाटे ५.३० वाजता या प्रणालीचे केंद्र नैऋत्य बंगालच्या उपसागरात होते. मागील सहा तासांत ही प्रणाली ताशी आठ किलोमीटर वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकली आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. शेतकरी आणि नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे. 'अक्वान' हे नाव इराणने दिले आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळांना १३ देशांनी सुचवलेल्या नावांनुसार नावे दिली जातात.
हवामान प्रणालीचा परिणाम तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांवरही होण्याची शक्यता आहे. १७ नोव्हेंबरपासून चेन्नई, तिरुवल्लूर आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. १८ नोव्हेंबरपासून येथील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तुतिकोरिन, नागरकोइल, कन्याकुमारी, चेन्नई, निलगिरी, विरुधुनगर आणि पुदुच्चेरीमध्ये पाऊस झाला. मच्छीमारांना १६ ते २१ नोव्हेंबरदरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
‘अर्णब’ आणि ‘मुरासू’ या चक्रीवादळांमुळे आंध्र प्रदेशातील लाखो एकरांवरील शेती उद्ध्वस्त झाली असून, राज्याचे जवळपास सात हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.