

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ठार झालेल्या तीन खलिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मंगळवारी रात्री उशिरा अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिका चक्काचूर झाली आहे. या घटनेची पुष्टी पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर बायपासजवळ ही अपघाताची घटना घडली.
रामपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विद्यासागर मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन संशयित दहशतवाद्यांचे मृतदेह पीलीभीत येथून पंजाबला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मंगळवारी रात्री उशिरा रामपूर बायपासवर अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच, रामपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तीन मृतदेह अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतून दुसऱ्या वाहनात हलवले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलिस चौकीवर ग्रेनेडने हल्ला करणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत तीन खलिस्तानी दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात २३ डिसेंबरच्या पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार केले होते. उत्तर प्रदेश (UP Police) आणि पंजाब पोलिसांनी (Punjab Police) ही संयुक्त कारवाई केली. गुरविंदर सिंग (वय २५), वीरेंद्र सिंग (२३) आणि जसप्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग (१८) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही खलिस्तान कमांडो फोर्स या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित होते. पंजाब पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत त्यांना मारण्यात आले. या तीन खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर हल्ला केला होता. या प्रकरणी तिघेही पोलिसांना हवे होते. त्यांच्याकडील दोन एके-४७ रायफल, दोन पिस्तुले जप्त करण्यात आली होती.