

नवी दिल्ली : देशातील दुग्ध क्षेत्रातील दिग्गज संस्था असलेल्या 'गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन'ने (GCMMF) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. 'अमूल' ब्रँड अंतर्गत विक्री होणाऱ्या दुधाच्या किमतीत देशभरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा फेडरेशनने केली आहे. ही दरवाढ गुरुवारपासून, म्हणजेच १४ मे २०२६ पासून लागू होणार असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमूलने दिलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ताज्या दुधाच्या पिशव्यांमधील सर्व प्रमुख प्रकारांमध्ये (उदा. अमूल ताजा, अमूल गोल्ड, अमूल शक्ती इ.) ही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम देशभरातील बाजारपेठांवर होणार आहे. फेडरेशनने स्पष्ट केले आहे की, ही दरवाढ साधारणपणे २.५ ते ३.५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. विशेष म्हणजे, ही वाढ सध्याच्या सरासरी अन्नधान्य महागाई दरापेक्षा कमी असल्याचे समर्थनही फेडरेशनकडून करण्यात आले आहे. याआधी अमूलने १ मे २०२५ रोजी दुधाचे दर वाढवले होते.
दुधाच्या किमती वाढवण्यामागे उत्पादनावरील वाढता खर्च हे मुख्य कारण असल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे. गेल्या वर्षभरात अनेक बाबी महागल्याने ही दरवाढ अनिवार्य झाली होती. जनावरांच्या खाद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने दुग्धोत्पादन खर्च वाढला आहे. दूध भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक फिल्मच्या किमतीतही वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे दुधाच्या वाहतुकीचा खर्च वाढला असून त्याचा भार आता ग्राहकांवर टाकला जात आहे, अशी कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत.
ग्राहकांसाठी दूध महागले असले तरी, सहकारी संस्थेने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार केल्याचे सांगितले आहे. फेडरेशनच्या सदस्य संघांनी शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर फॅटमागे ३० रुपयांची वाढ केली आहे. मे २०२५ च्या तुलनेत ही वाढ ३.७ टक्के इतकी असून, यामुळे दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यास मदत होणार आहे. अमूलने घेतलेल्या या निर्णयामुळे आता इतर दूध उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थादेखील आपल्या किमती वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.