

अमृतसर; वृत्तसंस्था : पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात प्रेयसीने आपल्या चुलत भावाच्या मदतीने माजी प्रियकराला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात संदीप सिंह (रा. बल खुर्द) याचा जागीच मृत्यू झाला असून, आरोपी महिला आणि तिचा चुलत भाऊ भाजल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत.
संदीप आणि आरोपी महिला यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. दोघे एकत्र कामही करत होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे संबंध तुटले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी संदीपने दुसऱ्या महिलेशी विवाह केला होता. बुधवारी आरोपी महिलेने संदीपला भेटण्याच्या बहाण्याने माझीठा येथील तिच्या घरी बोलावले. दोघांमध्ये बोलणे सुरू असताना वाद झाला. त्यानंतर महिलेने तिच्या चुलत भावाच्या मदतीने संदीपवर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिल्याचा आरोप आहे. आगीत होरपळत असताना संदीपने स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात आरोपी महिलेला पकडले. त्यामुळे तीही आगीच्या विळख्यात सापडली. त्यांना सोडविण्यासाठी आलेला चुलत भाऊ हरपाल सिंह हाही गंभीररीत्या भाजला गेला. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत संदीपचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मजीठा पोलीस ठाण्याचे एसएचओ कर्मपाल सिंह यांनी सांगितले की, युवक आणि युवतीनेच युवकाला आग लावली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमसंबंधातील दुराव्यानंतर उचललेल्या या भयानक पावलाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.