Amit Shah Punjab visit: पंजाबमधून २०२९ पर्यंत अमली पदार्थ हद्दपार करू: अमित शहा

अमली पदार्थविरोधी लढ्यातील बळींच्या कुटुंबीयांना न्यायाची ग्वाही
Amit Shah
Amit ShahPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

गुरदासपूर / चंदीगड: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी पंजाबमधील गुरदासपूर येथे जाऊन अमली पदार्थ तस्करांविरोधात आवाज उठवल्यामुळे हत्या झालेल्या बिक्रमजीत सिंग यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

शहा यांनी पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून, डिसेंबर २०२९ पर्यंत पंजाबमधून अमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेलिकॉप्टरने बटाला येथे दाखल झाल्यानंतर शहा थेट मारी पानवान गावात पोहोचले. १५ ऑक्टोबर रोजी ४० वर्षीय बिक्रमजीत सिंग यांची हत्या झाली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीला विरोध केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली.

शहा यांनी कुटुंबीयांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांचे निवेदन स्वीकारले. पंजाब भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी सांगितले की, पीडित कुटुंबाने आम आदमी पक्षाच्या सरकारकडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

Amit Shah
Thane Mayor Driver Case: महापौरांच्या चालकाकडून कॅमेरामनला मारहाण; आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस

संगरूर, मानसा येथेही भेटी

अमित शहा संगरूर आणि मानसा जिल्ह्यांचाही दौरा करणार आहेत. संगरूरमध्ये ते अमली पदार्थांच्या मुद्द्यावरून मंत्र्यांना जाब विचारल्यानंतर झालेल्या त्रासामुळे आत्महत्या केलेले दलित व्यक्ती गुलजार सिंग यांच्या कुटुंबीयांना भेटले. त्यानंतर मानसा येथे औषध दुकानांवर होणाऱ्या नशाखोरीविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांच्या कुटुंबीयांना ते भेटले.

झोटा हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पंजाब दौऱ्याच्या काही तास आधी राज्य सरकारने ड्रग्जविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘एक्स’वर ही माहिती दिली.

झोटा यांच्या कुटुंबीयांच्या मागणीचा आदर करून हा तपास केंद्रीय यंत्रणेकडे दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीबीआय चौकशीची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत कुटुंबीयांनी शवविच्छेदनास नकार दिला होता. अखेर वाढता जनक्षोभ आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मानसा, संगरूर व गुरुदासपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तपास सीबीआयकडे सुपूर्द केला.

राजकीय वातावरण तापले

पंजाबमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने या दौऱ्यावरून राजकीय वाद पेटला आहे. सत्ताधारी ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा यांनी शहा यांच्या दौऱ्यावर टीका करत, केंद्राने पाकिस्तानमधून होणारी तस्करी आणि गुजरात बंदरावरून येणाऱ्या अमली पदार्थांच्या मुद्द्यावर उत्तरे द्यावीत, असा पलटवार केला आहे. दरम्यान, शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तिन्ही जिल्ह्यांत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news