

Department of Indian Languages |
नवी दिल्ली : भारतीय भाषा विभागाच्या स्थापनेमुळे राजभाषा विभाग आता एक संपूर्ण विभाग बनला आहे. प्रशासनाला परदेशी भाषांच्या प्रभावापासून मुक्त करण्याच्या दिशेने हे एक मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
अमित शाह यांनी शुक्रवारी राजधानी दिल्ली येथे भारतीय भाषा विभागाचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय गृह सचिव आणि राजभाषा सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय भाषा विभागाच्या स्थापनेमुळे राजभाषा विभाग एक संपूर्ण विभाग बनला आहे. जेव्हा आपले विचार, विश्लेषण आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया आपल्या मातृभाषेत असेल तेव्हाच आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करता येईल. देशातील सर्व स्थानिक भाषांना बळ देऊनच आपण भारताला शाश्वत वैभवशाली उंचीवर घेऊन जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, आपली प्रत्येक भाषा इतर भाषांशी पूर्णपणे जोडलेली आहे आणि सर्व भाषांचा विकास एकमेकांशिवाय शक्य नाही. आपल्या सर्व भाषिक नद्या एकत्रितपणे भारतीय संस्कृतीची गंगा बनवतात. भारतीय भाषा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहेत आणि आपली संस्कृती भारताचा आत्मा आहे. भारतीय भाषा विभाग भारताच्या भाषिक विविधतेचा समावेश करून सर्व भाषांना एक मजबूत आणि संघटित व्यासपीठ प्रदान करेल तसेच आपण सर्व भाषांची समृद्धता आणि संवेदनशीलता कमी न करता तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. भाषेद्वारे आपल्यावर इंग्रजी लादण्याची लढाई आपण निश्चितच जिंकू, असेही अमित शाह म्हणाले.