

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये नवीन बहु संस्था केंद्र म्हणजेच ‘मल्टी एजन्सी सेंटर’ (मॅक) चे शुक्रवारी उद्घाटन केले. नवीन ‘मॅक’ राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी काम करणार आहे, असे गृहमंत्री म्हणाले. दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि सायबर हल्ले यासारख्या गंभीर धोक्यांना तोंड देण्यासाठी ‘मॅक’ उपयुक्त ठरणार आहे.
अमित शाह यांनी नवीन ‘मॅक’ जाळ्याचे कौतुक केले. हे नवीन जाळे डेटा विश्लेषणाची गुणवत्ता उच्च पातळीवर नेईल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. यामुळे गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होईल. संघटित गुन्हेगारीशी गुंतागुंतीचे संबंध असलेल्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी नवीन मॅक उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, भारताचे अग्रगण्य गुप्तचर समन्वय केंद्र म्हणून, मल्टी एजन्सी सेंटर (मॅक) २००१ पासून अस्तित्वात आहे. आता नवीन मॅक सर्व गुप्तचर, सुरक्षा, कायदा अंमलबजावणी आणि तपास संस्थांना जोडणार आहे. ५०० कोटींहून अधिक खर्च करून अंमलात आणलेल्या या नवीन मॅक जाळ्यामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही परिवर्तन झाले आहेत. देशाच्या सर्व भागांमध्ये पसरलेल्या नवीन मॅक जाळ्यामध्ये देशातील दुर्गम भाग, नक्षलग्रस्त क्षेत्र आणि डोंगराळ भूभाग यांचा समावेश केला आहे. यामुळे दुर्गम भागातील जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पातळीपर्यंत जलद आणि स्वतंत्र सुरक्षित जाळ्यासह कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
अमित शाह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ राजकीय इच्छाशक्ती, गुप्तचर संस्थांची अचूक माहिती आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या अतुलनीय क्षमतेचे एक अद्वितीय प्रतीक आहे. भारताला आपल्या तिन्ही सशस्त्र दलांचा, सीमा सुरक्षा दलाचा आणि सर्व सुरक्षा संस्थांचा अभिमान आहे, असे ते म्हणाले. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगाट्लू हिल्स (केजीएच) येथे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांनी (सीएपीएफ) अलीकडेच केलेल्या ऐतिहासिक नक्षलविरोधी कारवायांबद्दल बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, नक्षलवादाविरुद्धच्या या कारवायांमधून आपल्या सुरक्षा दलांमधील उत्कृष्ट समन्वय दिसून येतो. शाह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यानही असाच समन्वय दिसून आला. आपल्या गुप्तचर संस्था आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या कार्यपद्धतीत आणि विचारसरणीत खूप चांगला समन्वय असल्याचे यावरुन दिसून येते असे ते म्हणाले.