

नागपूर : माधव नेत्रालयाच्या नव्या परिसराचे काम आज आपण सुरू करत आहोत. तेव्हा दृष्टीची गोष्ट होणे स्वाभाविक आहे. दृष्टीच दिशा देते. त्यामुळे आपण १०० वर्षापर्यंत पाहू शकलो पाहिजे, अशी कामना वेदांमध्ये केली गेली आहे. लोकांच्या जिवनातील अंधकार दूर करून माधव नेत्रालय त्यांच्या जिवनात प्रकाश आणत आहे. माधव नेत्रालय म्हणजे अध्यात्म, ज्ञान आणि गौरव गुरुतेचे अदभूत विद्यालय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नागपुरातील हिंगणा मार्गावर माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपुजन आज (३० मार्च) पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, बाह्य दृष्टी आवश्यक आहेच. पण सोबत अंतःदृष्टीही असली पाहिजे. अंतःदृष्टीच्या विषयावर बोलत असताना विदर्भातील संत गुलाबराव महाराजांचे स्मरण झालेच पाहिजे. त्यांना डोळ्यांनी दिसत नव्हते. तरी त्यांनी पुस्तकं लिहिले. डोळ्यांनी दिसत नसतानाही त्यांनी ग्रंथच्या ग्रंथ कसे लिहीले असतील, हा प्रश्न साहजिकच पडतो. त्यांच्याजवळ दृष्टी नव्हती, पण अंतःदृष्टी होती. ही दृष्टी विवेकातून प्रगट होते. ती व्यक्तीच्या सोबतच समाजालाही शक्ती देते. त्यामुळे आज देशाला दृष्टीसोबतच अंतःदृष्टीचीही गरज आहे.
आजवर देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची चिंता वाटू नये. गरीबातील गरीबाला चांगल्यात चांगला उपचार मिळावा, ही सरकारची निती आहे. त्यामुळे आपण आयुष्यमान भारत ही योजना आणली. आयुष्यमान भारतमुळे आज कोट्यवधी लोकांना मोफत उपचार मिळत आहेत. हजारो जनऔषधी केंद्र गरिबांना, मध्यमवर्गीयांनी स्वस्त दरात औषधी देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पुढे ते म्हणाले, गरीबांसाठी हजारो डायलीसीस केंद्र चालवले जात आहेत. हे केंद्र मोफत डायलीसीस करत रुग्ण सेवेचा यज्ञ चालवत आहेत. देशातील लोकांचे हजारो कोटी रुपये वाचत आहेत. त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. गेल्या १० वर्षात लाखो आयुष्यमान आरोग्य मंदीर बनले. चांगल्या डॉक्टरांकडून लोकांना उपचार मिळत आहेत, हे या योजनेचे यश आहे. सरकारने मेडीकल कॉलेज दुपटीने वाढवले. मेडिकलच्या सीट दुप्पट केल्या. येत्या काळात लोकांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त डॉक्टर्स आणि चांगले डॉक्टर्स उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी आम्ही साहसी निर्णय घेतला असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
भारत देश आज गुलामीची मानसीकता तोडून पुढे जात आहे. राष्ट्रीय गौरवाचे नवेनवे अध्याय लिहिले जात आहेत. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठी तपस्या केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इंग्रजांनी भारतीय लोकांना तृच्छ लेखण्यासाठी कायदे बनवले होते. आपल्या देशाने ते बदलवले आणि दंड संहितेच्या जागी आता भारतीय न्याय संहिता लागू झाली आहे. आता राजपथ नाही, तर कर्तव्यपथ आहे. नौसेनेच्या ध्वजावर पूर्वी गुलामीचे चिन्ह होते. आता नौसेनेच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक आहे. अंदमान द्विपवर सावरकरांनी देशासाठी यातना सहन केल्या होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी बिगूल फुंकले होते. आज त्या द्विपांना आझादीच्या नायकांचे नाव दिले आहे. असे ते म्हणाले.
'वसुधैव कुंटुंबकम', जगाच्या कोपऱ्यात पोहोचत आहे. जग आपल्या कार्यात हे सर्व बघत आहे. कोविडमध्ये भारताने संपूर्ण विश्वाला आपला परिवार मानून व्हॅक्सीन उपलब्ध करून दिले होते. भारत मनापासून सेवेसाठी तयार असतो. म्यानमारमध्ये भुकंप आला. भारत ऑपरेशन ब्रम्हामार्फत त्या लोकांच्या मदतीसाठी पहिले पोहोचला. तुर्कीमध्ये भुकंप, नेपाळमध्ये भुकंप झाला, तेव्हा भारताने मदत करण्यात क्षणभरही विलंब नाही केला. युद्धाच्या काळातही दुसऱ्या देशातील लोकांना सुरक्षित काढून आणल्याचेही मोदी मोदी म्हणाले.