

Amit Shah Attacks Rahul Gandhi
चंदीगड : राहुल गांधी यांच्या दुकानात फक्त विषच मिळते. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या वर्धापनदिनी दिल्लीत रॅली काढून ‘इंडी’ आघाडीने या दंगलीतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जुन्या वेदनादायी आठवणींवर राहुल गांधी यांनी मीठ चोळले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर काढण्यात आलेल्या रॅलीवर कडाडून टीका केली.
चंदीगडमध्ये विकास प्रकल्पांच्या शिलान्यास समारंभादरम्यान शहा बोलत होते. १ नोव्हेंबर रोजी राजधानीत असा ‘जल्लोष’ (जलसा) आयोजित करून काँग्रेसने आपण असंवेदनशील असल्याचे दाखवून दिले, असा आरोप शहा यांनी केला. निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधकांच्या ‘मॉक पार्लमेंट' (प्रतीकात्मक संसद) वर भाष्य करताना शहा यांनी राहुल गांधी फक्त ‘मॉक पार्लमेंट’मध्येच पंतप्रधान होऊ शकतात, असा उपरोधिक टोलाही लगावला.
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख करत अमित शहा यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीच्या रस्त्यांवर हजारो निष्पाप शिखांची निर्घृण हत्या केली गेली. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, लोकांना जिवंत जाळण्यात आले, अबोध बाळे अनाथ झाली, महिला विधवा झाल्या आणि घरांची राख झाली. शिखांचा नरसंहार झाला, त्याच दिवशी राहुल गांधी यांनी रॅली आयोजित करून शिखांचा अपमान केला, असे शहा म्हणाले.
दंगलींनंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘जेव्हा एखादे मोठे झाड कोसळते, तेव्हा जमीन थरथरणारच’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. राजीव गांधी यांचे हे वक्तव्य मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. हजारो निरपराधांच्या हत्येनंतर अशी असंवेदनशील टिप्पणी फक्त काँग्रेसचे नेतृत्वच करू शकते. देशाने राजकीय पक्षाने प्रायोजित केलेली अशी दंगल यापूर्वी कधीही पाहिली नव्हती आणि भविष्यात पाहणार नाही, असेही शहा म्हणाले.
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १९८४ च्या दंगलीची प्रकरणे पुन्हा उघडली, पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई दिली आणि दोषी काँग्रेस नेत्यांना तुरुंगात पाठवले, असेही शहा यांनी आवर्जून सांगितले.