

तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ॲमेझॉनने मोठं पाऊल उचललं आहे. ॲमेझॉनने त्यांच्या ‘ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर’ (AFE) कार्यक्रमाअंतर्गत २०२६ साठी ५०० नव्या शिष्यवृत्तींची घोषणा केली आहे. या विस्तारामुळे आता या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २२०० वर पोहोचणार आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत संगणकशास्त्र किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील महिला विद्यार्थिनींना चार वर्षांमध्ये तब्बल २ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आर्थिक सहाय्यासोबतच विद्यार्थिनींना तांत्रिक प्रशिक्षण, मार्गदर्शन, इंटर्नशिप आणि करिअरच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
महिलांना तंत्रज्ञान क्षेत्रात संधी देण्यावर भर
ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर हा ॲमेझॉनचा जागतिक शिक्षण उपक्रम असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षण आणि करिअरच्या संधी अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश आहे. भारतात विशेषतः ग्रामीण आणि निम्न आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या मुलींना तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे आणण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थिनींना लॅपटॉप, बूटकॅम्पद्वारे तांत्रिक प्रशिक्षण, ॲमेझॉनच्या महिला अभियंत्यांकडून मार्गदर्शन, वेबिनार आणि दुसऱ्या वर्षानंतर आठ आठवड्यांची सशुल्क इंटर्नशिपची संधी दिली जाते.
२०२२ मध्ये केवळ २०० विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या कार्यक्रमाने गेल्या काही वर्षांत मोठा विस्तार केला आहे. आता दरवर्षी ५०० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाते. विशेष म्हणजे २०२५ मध्ये पदवीधर झालेल्या पहिल्या तुकडीतील तब्बल ८९ टक्के विद्यार्थिनींना ॲमेझॉनसह अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत.
आजपर्यंत जवळपास ४०० विद्यार्थिनींनी ॲमेझॉनमध्ये विविध तांत्रिक पदांवर इंटर्नशिप पूर्ण केली आहे. येत्या काही महिन्यांत आणखी शेकडो विद्यार्थिनी इंटर्नशिपसाठी पात्र ठरणार आहेत.
टिअर-२ आणि टिअर-३ शहरांतील विद्यार्थिनींना मोठी संधी
या कार्यक्रमातील अनेक विद्यार्थिनी या टिअर-२ आणि टिअर-३ शहरांतील असून त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्याच पदवीधर आहेत. त्यामुळे या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांतील मुलींना जागतिक दर्जाच्या करिअरची दारे खुली होत असल्याचे दिसून येते.
तेलंगणातील श्रेया मुला सध्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून काम करत आहे, तर आंध्र प्रदेशची कीर्ती संकारा क्लाऊड सपोर्ट असोसिएट म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रातील नागपूरची अंजली अष्टके डॉईश बँकेत ग्रॅज्युएट ॲनालिस्ट म्हणून काम करत आहे. या उदाहरणांमधून कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.
५० कोटी रुपयांची गुंतवणूक
ॲमेझॉनने २०२२ पासून या कार्यक्रमात सुमारे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फाऊंडेशन फॉर एक्सलन्स आणि नवगुरुकुल यांच्या भागीदारीत हा कार्यक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांना उद्योगाशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जाते.
४.८ दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच
या कार्यक्रमाचा प्रभाव केवळ अभियांत्रिकी शिक्षणापुरता मर्यादित नाही. २०२१ ते २०२५ या कालावधीत भारतातील ५० हजारांहून अधिक सरकारी शाळांमधील ४.८ दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षण पोहोचवण्यात आले आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आणि भविष्यातील कुशल अभियंते तयार करण्यासाठी ॲमेझॉनचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.=