

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
देशातील सर्व सहकारी साखर कारखाने इथेनॉल उत्पादक होणार असल्याची भविष्यवाणी केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (दि.10) केली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्यात विविध प्रकारांमध्ये देशातील २१ साखर कारखान्यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी २१ पैकी १० पुरस्कार महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांना प्रदान करण्यात आले. दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
अमित शाह म्हणाले की, मागील १० वर्षात देशातील साखर उद्योगात बरीच प्रगती झाली आहे. २०१३-१४ मध्ये ५ दशलक्ष हेक्टर उसाचे क्षेत्र होते, त्यात १८ टक्क्यांची वाढ होऊन ६ दशलक्ष हेक्टर उसाचे क्षेत्र देशात झाले आहे. २०१३-१४ मध्ये साखर उद्योगातून केवळ ३८ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन व्हायचे. आता इथेनॉलचे उत्पन्न ३७० कोटी लिटर इतके वाढले आहे. त्याचा थेट फायदा शेतकऱ्याला होतो. देशात जैव-इंधन म्हणून इथेनॉल ब्लेंडींग अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. इथेनॉल ऊर्जा सुरक्षा, पर्यावरणीय शाश्वतता, आर्थिक वाढ आणि ग्रामीण सशक्तीकरणाला चालना देत असल्याचे शाह म्हणाले. २०३० पर्यंत २०% इथेनॉल ब्लेंडींग करण्याचे पंतप्रधान मोदींचे लक्ष्य आहे. मात्र, येत्या दोन वर्षातच हे लक्ष्य गाठण्याचा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात, अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला दिला जाणारा, ‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कारा’ने पुणे जिल्ह्यातील ‘भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या’चा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, साखर क्षेत्राशी संबंधित केंद्रातील आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यात २१ पुरस्कारांपैकी महाराष्ट्राने एकूण १० पुरस्कारांसह पहिला तर उत्तर प्रदेशने ४ पुरस्कारांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. गुजरात, तामिळनाडू यांना प्रत्येकी २ तर पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशला प्रत्येकी १ पुरस्कार मिळाला आहे. देशातील ९२ सहकारी साखर कारखान्यांनी गुणवत्ता पुरस्कारासाठी सहभाग घेतला. यात महाराष्ट्र (३८), उत्तर प्रदेश (११), गुजरात (११), तामिळनाडू (१०), पंजाब (८), हरियाणा (८), कर्नाटक (४) आणि मध्य प्रदेश आणि उत्तराखंड (प्रत्येकी एक) सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारखाने (उत्तम ऊस उत्पादकता,उच्च उत्पन्न विभाग)
प्रथम : क्रांतिकारक डॉ. जी.डी. बापू लाड शेतकरी सहकारी कारखाना (पो, कुंडल, जिल्हा पलूस, जिल्हा सांगली, महाराष्ट्र)
द्वितीय: लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना (सुंदरनगर. माजलगाव, जि. बीड, महाराष्ट्र)
तांत्रिक कार्यक्षमता, उच्च उत्पन्न विभाग
प्रथम: श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना (माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र)
दुसरा: श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना (जुन्नर आंबेगाव, निवृत्ती नगर जि. पुणे, महाराष्ट्र)
विक्रमी ऊस गाळप/उच्च उत्पन्न विभाग –
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (गंगामाईनगर-पिंपळनेर, माढा, जि. सोलापूर, महाराष्ट्र)
विक्रमी ऊस वसुली
डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना मर्यादित मोहनराव कदम नगर, वांगी, कडेगाव, जि. सांगली (महाराष्ट्र)
अत्युत्कृष्ट साखर कारखाना
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना (कागल, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र)
साखरेची विक्रमी निर्यात
प्रथम: जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना. (हुपरी-यलगुड, तालुका – हातकणंगले, जिल्हा. कोल्हापूर, महाराष्ट्र)
दुसरा : सह्याद्री सहकारी साखर कारखाना (यशवंतनगर, तालुका – कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र)