

नवी दिल्ली : १२ डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असतो. अलीकडे झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त १० डिसेंबरला एका विशेष मेजवानीचे आयोजन शरद पवारांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमाला अजित पवार आवर्जून उपस्थित होते. हा दौरा त्यांचा शेवटचा दिल्ली दौरा ठरला.
याच कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांच्यासह राजकारण, उद्योग आणि विविध क्षेत्रातल्या दिग्गजांचा समावेश होता. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना देखील अजित पवार आपल्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीत आले होते. या कार्यक्रमाची मोठी चर्चा झाली, त्याला अनेक कारणे होती. या कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांसोबत खास फोटोही काढला होता. हा पहिलाच असा कार्यक्रम होता जिथे राहुल गांधी आणि गौतम अदानी एका छताखाली होते. त्यामुळे शरद पवारांसह पवार कुटुंबाची ताकद यानिमित्ताने दिसल्याच्या चर्चाही दिल्लीत होत्या. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दिवशी अजित पवार बराच वेळ दिल्लीत होते. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा दौरा म्हणजे अजित पवारांची शेवटची दिल्लीवारी ठरली.
यापूर्वीच्या वाढदिवसालाही शरद पवारांना शुभेच्छा द्यायला अजित पवार सहकुटुंब दिल्लीत आले होते. त्यावेळी पक्ष फुटून फार काळ झाला नव्हता. त्यामुळे शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवार येणार का याबद्दल साशंकता होती. मात्र १२ डिसेंबर 2025 ची सकाळ उजाडली आणि अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पक्षातील सहकारी प्रफुल पटेल शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास तासभर झालेल्या या भेटीत अजित पवार आणि कुटुंबियांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे पक्ष फुटला असला तरी कुटुंब म्हणून आम्ही अभेद्य आहोत, असा संदेशच यानिमित्ताने पवार कुटुंबाने दिला होता.