

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लवकरच चीनला जात आहेत. येत्या आठवड्यात हा दौरा होण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२४ नंतर डोवाल यांचा हा दुसरा चीन दौरा असेल. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या तयारीसाठी चीनमध्ये बैठक होत आहे.
या बैठकीला एससीओ देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित असतील. दरम्यान, या दौऱ्यातून दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश देणे हा भारताचा मुख्य उद्देश आहे. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. याच दौऱ्यात भारत-चीन संबंध सुधारणे, थेट विमानसेवा यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरच्या सुरुवातीला चीनमध्ये एससीओ शिखर परिषदेचे आयोजन केले जाईल. या परिषदेच्या पूर्वी चीनमध्ये महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी चीनमध्ये असताना डोवाल चीन आणि रशियामधील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांनी भेटतील आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करतील.
इस्रायल आणि इराणमध्ये सध्या जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. अशा परिस्थितीत, इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या एससीओ बैठकीला उपस्थित राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित डोवाल एससीओच्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना भेटतील. डोवाल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भेटतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणात चीनकडून पाकिस्तानला मिळत असलेल्या लष्करी पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.