

POCSO Case:
कानपूर: अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणात पीडितेच्या बदललेल्या जबाबानंतर हवाई दलाच्या जवानाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कानपूरच्या एका विशेष न्यायालयाने आपल्या अल्पवयीन मेहुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपातून हवाई दलाच्या जवानाची सुटका केली. मुलीने न्यायालयात दिलेल्या साक्षीत सांगितले की, 'ही घटना प्रत्यक्षात न घडता स्वप्नात घडली होती आणि तिने गैरसमजातून आरडाओरडा केला होता.' मात्र, या प्रकरणामुळे एका जवानाला १९ दिवस तुरुंगात राहावे लागले.
ही घटना ८ मार्च २०१९ रोजी कानपूरच्या नौबस्ता येथील खाडेपूरमध्ये घडली होती. पीडित १५ वर्षीय मुलगी आपल्या मोठ्या बहिणीच्या सासरी आली होती. तिथे झोपलेली असताना बहिणीचा पती (मेहुणा) अनुराग शुक्ला याने तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सुमारे पाच महिन्यांनंतर ३ ऑगस्ट २०१९ रोजी नौबस्ता पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि शुक्ला यांना अटक करण्यात आली होती. बचाव पक्षाचे वकील करीम अहमद सिद्दीकी यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला सांगितले की, जामीन मिळण्यापूर्वी शुक्ला यांना १९ दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता.
बचाव पक्षाचे वकील करीम अहमद सिद्दीकी यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, सुनावणी दरम्यान पीडितेने कबूल केले की घटनेच्या वेळी ती आजारी होती आणि ‘अँटीबायोटिक’ औषधे घेत होती. औषधांच्या प्रभावामुळे ती अर्धवट शुद्धीत होती. "मला स्वप्नात जाणवले की मला पकडले आहे, त्यामुळे मी घाबरून जागी झाले आणि आरडाओरडा केला. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नव्हते," असे पीडितेने न्यायालयात सांगितले. मुलीचे वडील आणि मोठ्या बहिणीनेही ही तक्रार केवळ गैरसमजातून झाल्याचे मान्य केले.
विशेष पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रश्मी सिंह यांनी ७ मार्च रोजी शुक्ला यांची निर्दोष मुक्तता केली, ज्यामुळे सात वर्षांचा कायदेशीर लढा संपला. अनुराग शुक्ला यांनी फोनवरून सांगितले की, २९ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती आणि १७ ऑक्टोबर रोजी जामीन मिळेपर्यंत ते तुरुंगात होते.
त्यांनी पुढे सांगितले की, या खटल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला, तसेच त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचे आणि करिअरचे नुकसान झाले. त्यांनी असा दावा केला की, या खटल्यामुळे २०२० मध्ये त्यांना 'कॉर्पोरल' पदावर पदोन्नती मिळू शकली नाही आणि त्यांना 'लीडिंग एअरक्राफ्टमन' म्हणूनच काम करावे लागले. शुक्ला यांनी असाही आरोप केला की, "मला या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले कारण माझे सासरे विजय तिवारी यांना वाटत होते की मी माझी जमीन, घर आणि इतर मालमत्ता पत्नी आणि मेहुणीच्या नावावर करावी."