AI Summit 2026 : एआय भय नव्हे, भविष्य.. एआयचे लोकशाहीकरण गरजेचे : पीएम नरेंद्र मोदी

India AI Summit 2026 : एआय समिटच्या उद्घाटनप्रसंगी ‌‘मानव व्हिजन‌’ची घोषणा
AI Summit 2026 : एआय भय नव्हे, भविष्य.. एआयचे लोकशाहीकरण गरजेचे : पीएम नरेंद्र मोदी
Published on
Updated on

नवी दिल्ली : एआय हे भय नव्हे तर भविष्य असल्याचे सांगत भारताच्या ‌‘मानव व्हिजन‌’ची घोषणा करत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सर्वांसाठी खुली आणि लोकाभिमुख असली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ठामपणे सांगितले. नवी दिल्लीतील ‌‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’च्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी एआय ही मानव इतिहासातील परिवर्तनकारी शक्ती असल्याचे नमूद केले आणि भारत केवळ एआय क्रांतीचा भाग नसून तिचे नेतृत्व करत असल्याचा दावा केला.

मोदी म्हणाले की, एआयचे लोकशाहीकरण झाले नाही तर मानव फक्त ‌‘डेटा पॉईंट‌’ किंवा कच्चा माल बनून राहण्याचा धोका आहे.‌‘एआय हे समावेशक आणि सक्षमीकरणाचे साधन बनले पाहिजे, विशेषतः ग्लोबल साऊथसाठी, असे ते म्हणाले.

त्यांनी एआयला ‌‘ओपन स्काय‌’ देण्याची गरज व्यक्त केली. मात्र त्याचवेळी मजबूत मानवी नियंत्रण आणि पारदर्शक देखरेखीची आवश्यकता अधोरेखित केली. एआयचा योग्य वापर झाला तर गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण शक्य आहे. परंतु चुकीच्या वापरामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते, असा इशाराही देत 21व्या शतकातील एआय आधारित जगात मानवकल्याणासाठी भारताची ‌‘मानव व्हिजन‌’ महत्त्वाची कडी ठरेल, असे मोदी यांनी सांगितले.

मोदी यांनी एआयला मानवी इतिहासातील एक निर्णायक वळणबिंदू संबोधले. इतिहासात काही क्षण असे असतात जे शतकांची दिशा ठरवतात. एआय हा तसाच परिवर्तनाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.

युवकांचा एआयकडे वाढता कल अभूतपूर्व असल्याचे त्यांनी नमूद केले. समिटमधील एआय प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभाग घेतल्याचा त्यांनी उल्लेख केला.

जबाबदार वापराची गरज

पंतप्रधानांनी डीपफेक आणि बनावट सामग्रीमुळे मुक्त समाजांना धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत सुरक्षा उपायांची आवश्यकता अधोरेखित केली. एआयचा वापर मानवकेंद्री ध्येयांपासून दूर गेला तर तो विनाशकारी ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. भारत एआयला प्रगतीची संधी म्हणून पाहतो, असे स्पष्ट करत त्यांनी एआयला जागतिक सार्वजनिक संपत्ती मानण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानाची देवाणघेवाण झाल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतील, असे त्यांनी सांगितले.

जागतिक नेत्यांची उपस्थिती

समिटमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ ईनॅसिओलुला डा सिल्व्हा, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके, भूतानचे पंतप्रधान तेशेतसिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम, क्रोएशियाचे पंतप्रधान अँड्रेझ प्लेंकोव्हीक, सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष ॲलेक्झांडर, सेशेल्सचे उपराष्ट्राध्यक्ष सॅबिस्टिन पिल्ले, एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष अलर कॅरिस आणि फिनलंडचे पंतप्रधान पटेरी ओर्पो यांची उपस्थिती होती.

‌‘मानव व्हिजन‌’ची रूपरेषा

  • पंतप्रधानांनी सादर केलेल्या ‌‘मानव‌’मध्ये पाच प्रमुख तत्त्वांचा समावेश आहे.

  • एम - मॉरल अँड एथिकल सिस्टीम : एआय नैतिक मार्गदर्शनावर आधारित असावी.

  • ए - अकाऊंटेबल गव्हर्नन्स : पारदर्शक नियम आणि प्रभावी देखरेख असावी.

  • एन - नॅशनल सोर्व्हेजिनिटी : ज्याचा डेटा, त्याचा अधिकार.

  • ए - ॲक्सिसिबल अँड इन्क्लुसिव्ह : एआय ही मक्तेदारी नसून सर्वांसाठी खुली असावी.

  • व्ही - व्हॅलिड ॲमड लेजिडीमेट : एआय कायदेशीर आणि पडताळणीयोग्य असावी.

  • एआय म्हणजे परिवर्तनाचा टप्पा

  • एआयचे लोकशाहीकरण करून सर्वांसाठी उपलब्ध करण्याचा भारताचा आग्रह.

  • ‘मानव व्हिजन‌’द्वारे नैतिक, पारदर्शक आणि सार्वभौम एआयची रूपरेषा.

  • डीपफेकसारख्या धोक्यांविरोधात मजबूत नियंत्रणाची गरज अधोरेखित.

  • भारत एआय क्रांतीत केवळ सहभागी नाही, तर नेतृत्व करत असल्याचा दावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news