Haridwar AI Video: महिलेचा गंगेत स्नान करतानाचा व्हिडिओ काढला अन् AI वापरुन...; हरिद्वारमध्ये संताप, कारवाईची मागणी

Haridwar AI Video: हरिद्वारच्या हर की पौडी येथे गंगा स्नान करणाऱ्या महिलेच्या व्हिडिओमध्ये AIच्या माध्यमातून छेडछाड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.
Haridwar AI Video
Haridwar AI VideoPudhari
Published on
Updated on

हरिद्वारच्या हर की पौडी येथील गंगा घाटावर स्नान करणाऱ्या एका महिला श्रद्धाळूचा व्हिडिओ AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मूळ व्हिडिओमध्ये महिला पुर्ण कपडे परिधान करून गंगा स्नान करताना दिसत होती. मात्र, या व्हिडिओमध्ये डिजिटल पद्धतीने बदल करून महिलेला अर्धनग्न अवस्थेत दाखवण्यात आले आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला.

या प्रकारामुळे हरिद्वारमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून हा व्हिडिओ आपलाच असल्याचा दावा केला असून, तिने हरियाणा क्राइम ब्रांचकडे तक्रार केल्याचे सांगितले आहे.

हर की पौडीवरील व्हिडिओ असल्याची श्री गंगा सभेची माहिती

श्री गंगा सभेच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हर की पौडी येथील मालवीय घाटाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची अधिकृत माहिती नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटावर गंगा स्नान करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ कुणीतरी चोरून शूट केला होता. त्यानंतर हा मूळ व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित झाला. पुढे काही व्यक्तींनी तो व्हिडिओ डाउनलोड करून AI किंवा इतर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यात छेडछाड केल्याचा आरोप आहे.

मूळ व्हिडिओमध्ये महिला सलवार-सूटमध्ये असल्याचे दिसत आहे. मात्र, कथितरीत्या एडिट केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या शरीराचे स्वरूप बदलून तिला अर्धनग्न अवस्थेत दाखवण्यात आले.

पोलिसांकडे तक्रार

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एका महिलेने समोर येत हा व्हिडिओ आपलाच असल्याचा दावा केला. तसेच, हर की पौडी येथे गंगा स्नान करतानाचा तिचा व्हिडिओ AI च्या माध्यमातून बदलण्यात आला आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने या प्रकरणी हरियाणा सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून या तक्रारीसंदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Haridwar AI Video
UPI MDR Charge: चहा, भाजीपाला, विजेची बिले, पेट्रोल, विमा, तिकीट, खरेदी... कुठे आणि किती पैसे कापले जाणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री गंगा सभेचा आक्षेप

या प्रकारावर श्री गंगा सभेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सभेचे अध्यक्ष नितिन गौतम यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्याचे सांगत, महिलांच्या प्रतिमा AIच्या माध्यमातून अशा प्रकारे बदलणे अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या घटनांमुळे हरिद्वारसारख्या धार्मिक स्थळांच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचतो. तीर्थस्थळांना बदनाम करण्याच्या उद्देशाने असे व्हिडिओ तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, हा प्रकार धार्मिक भावनांवर आघात करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Haridwar AI Video
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; चांदी तब्बल ३ हजारांनी महागली, तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

श्री गंगा सभेने शासन आणि प्रशासनाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन व्हिडिओ तयार करणाऱ्या आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात व्हिडिओ नेमका कोणी तयार केला, त्यामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर झाला आणि तो सर्वप्रथम कुठून प्रसारित झाला, याचा तपास अधिकृत तपास यंत्रणांकडून झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या महिलेचे आरोप आणि श्री गंगा सभेची भूमिका समोर आली असून, पोलिसांच्या अधिकृत तपासाची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news