

अहमदाबादजवळ गुरुवारी (दि.12) झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या भीषण विमान दुर्घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे. या अपघातात विमानातील 241 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर मेघानीनगर या गजबजलेल्या परिसरातील ज्या सिव्हिल हॉस्पिटलच्या होस्टेलवर हे विमान कोसळले तेथील 20 डॉक्टर ठार झाले. अशाप्रकारे या दुर्घटनेत एकूण 261 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात एकमेव प्रवासी रमेश विश्वकुमार (सीट 11 A) बचावला. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक तीव्र पोस्ट लिहून बोईंग कंपनी आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे विमान सुरक्षा आणि नियामक संस्थांच्या कार्यक्षमतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांनी X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये बोईंग 787-8 ड्रीमलाइनरच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी लिहिले, ‘अहमदाबाद विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. बोईंग 787 ड्रीमलाइनर, ज्याला सुरक्षित विमान म्हणून ओळखले जाते, त्याचा हा पहिलाच अपघात आहे. पण गेल्या काही वर्षांत बोईंगच्या विमानांबाबत अनेक तक्रारी आणि व्हिसलब्लोअरच्या चेतावण्या समोर आल्या आहेत. मग DGCA ने या तक्रारींकडे का दुर्लक्ष केले? बोईंगच्या विमानांची तपासणी आणि देखभाल प्रक्रिया कितपत पारदर्शक आहे? या अपघाताची जबाबदारी कोण घेणार?’ असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले, ‘एअर इंडियाच्या या विमानात 242 प्रवासी होते, त्यापैकी बहुतेकांचा मृत्यू झाला. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही बळी गेला. अशा घटनांमुळे नागरिकांचा विमान प्रवासावरील विश्वास डळमळतो. DGCA आणि बोईंगने आता पारदर्शकपणे तपास करून सत्य समोर आणावे आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कठोर पावले उचलावीत.’
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये बोईंगच्या मागील विवादांचा उल्लेख केला आहे. 2019 मध्ये बोईंग 737 मॅक्स 8 विमानांच्या दोन अपघातांमुळे (लायन एअर फ्लाइट 610 आणि इथिओपियन एअरलाइन्स फ्लाइट 302) जगभरात खळबळ माजली होती, ज्यात अनुक्रमे 189 आणि 157 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातांनंतर बोईंगच्या निर्मिती प्रक्रिया आणि सुरक्षितता मानकांवर प्रश्न उपस्थित झाले. तसेच, 2024 मध्ये बोईंगचे माजी कर्मचारी आणि व्हिसलब्लोअर जॉन बार्नेट यांनी 787 ड्रीमलाइनरच्या निर्मितीत दोष असल्याचा आरोप केला होता. त्यांनी दावा केला की, विमानाचे भाग चुकीच्या पद्धतीने जोडले गेले, ज्यामुळे दीर्घकाळ उड्डाणांदरम्यान धोका निर्माण होऊ शकतो. बार्नेट यांचा मृत्यू मार्च 2024 मध्ये संशयास्पद परिस्थितीत झाला, ज्याने बोईंगवरील संशय अधिक गडद केला.
याशिवाय, राज ठाकरे यांनी DGCA च्या निष्काळजीपणावरही बोट ठेवले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, बोईंगच्या विमानांबाबत वारंवार तक्रारी येत असताना DGCA ने त्यांची कठोर तपासणी का केली नाही? भारतात विमान देखभाल आणि तपासणी प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता यावरही त्यांनी शंका व्यक्त केली.
एअर इंडियाचे फ्लाइट AI-171, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (नोंदणी क्रमांक VT-ANB), अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन गॅटविकला जात होते. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स, एकूण 242 जण होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते. दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी (IST) उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत विमानाने 625 फूट उंची गाठली, परंतु त्यानंतर त्याचा सिग्नल गमावला. विमानाने मेडे कॉल (आपत्कालीन सिग्नल) दिला, परंतु त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. विमान मेघनीनगर परिसरात बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.