

नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघाताच्या ब्लॅक बॉक्स विश्लेषणात संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांना सामील करण्यास भारताने नकार दिला आहे. एअर इंडिया विमान अपघाताच्या ब्लॅक बॉक्समधील सर्व माहिती मिळवण्यात यश आले आहे. सध्या या माहितीचे विश्लेषण करणे दिल्लीमध्ये एएआयबीच्या मुख्यालयात सुरु आहे. मात्र, या विश्लेषणात संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांना सामील करण्यात आले नाही, असे सूत्रांनी सांगितले.
१२ जून रोजी, अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान कोसळले. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सच्या माहितीचे विश्लेषण केले जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्राची विमान वाहतूक संस्थेने चौकशीत मदत करण्यासाठीची भारताला ऑफर दिली होती. मात्र, भारताने नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (आयसीएओ) जगभरातील काही विमान अपघात प्रकरणांच्या चौकशीत मदत करण्यासाठी त्यांचे अधिकारी पाठवले आहेत. मात्र, अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीचे नेतृत्व भारताची विमान अपघात तपास संस्था (एएआयबी) करत आहे.