

बदलापूर : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बदलापूरचे रहिवासी आणि एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृतदेह शनिवारी बदलापुरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. यावेळी बदलापूरकरांनी साश्रू नयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर दीपकचं पार्थिव पाहून कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. मांजर्लीतल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणार्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता. मात्र डीएनए टेस्ट करून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मोठा कालावधी गेला. अखेर अपघाताच्या 9 व्या दिवशी त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. शनिवारी दीपक यांचा मृतदेह बदलापूरच्या कात्रप परिसरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. तिथे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह स्थानिक आमदार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर पातकर यांच्यासह बदलापूरकरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
दीपक यांचं पार्थिव पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो बदलापूरकर सहभागी झाले होते. अंत्यदर्शनानंतर बदलापूरमधल्या मांजर्ली स्मशानभूमी दीपक यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपक यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.