

Aadhaar Deepfake Scam
अहमदाबाद: सायबर गुन्हेगार फसवणुकीत किती पुढची पायरी गाठू शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबादमधील टोळीने गुगलच्या जेमिनी 'एआय' टूलचा वापर करून चक्क एका व्यावसायिकाचा 'डीपफेक' व्हिडिओ तयार केला. यामाध्यमातून आधार बायोमेट्रिक पडताळणीला बगल देत टोळीने व्यावसायिकाला गंडा घातला आहे. या प्रकरणी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे.
अहमदाबादमधील आयात-निर्यात व्यावसायिकाला दोन दिवसांपासून बँकेचे OTP (ओटीपी) येणे बंद झाले. संशय आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, त्यांच्या आधार कार्डाशी जोडलेला मोबाईल क्रमांक कोणत्याही ओटीपी पडताळणीशिवाय बदलण्यात आला होता. त्यांच्या बायोमेट्रिक डेटाशीही छेडछाड करण्यात आली होती.इतकेच नाही, तर या टोळीने त्या व्यावसायिकाच्या नावाने एक बँक खाते उघडून त्यावर २५,००० रुपयांचे कर्जही घेतले होते. महत्त्वाचे कागदपत्रे मिळवण्यासाठी या टोळीने त्यांच्या 'DigiLocker' (डिजी लॉकर) खात्यातही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने गुगलच्या 'जेमिनी एआय' टूलच्या मदतीने पीडित व्यक्तीचा हुबेहूब दिसणारा 'डीपफेक' व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओचा वापर करून त्यांनी आधारची बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. एकदा ओळख पटल्यानंतर त्यांनी आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलला, यामुळे सर्व महत्त्वाचे ओटीपी आरोपींच्या स्वतःच्या मोबाईलवर येऊ लागले. या माहितीच्या आधारे त्यांनी तीन बँकांमध्ये 'e-KYC' द्वारे खाती उघडण्याचा प्रयत्न केला. 'जिओ पेमेंट्स बँक'मध्ये खाते उघडले आणि तिथून त्यांनी कर्जही घेतले.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक जण 'कॉमन सर्व्हिस सेंटर' (CSC) मध्ये काम करत होता. त्याने आधार यंत्रणेचा आणि अधिकृत किट्सचा गैरवापर करून मोबाईल नंबर बदलण्याचे काम केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे कनुभाई परमार, आशिष वानंद, मोहम्मद कैफ पटेल आणि दीप गुप्ता अशी आहेत.
काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 'एआय'च्या वाढत्या धोक्यावर चर्चा केली होती. या चर्चेत विशेष प्रगत एआय मॉडेल्समुळे सायबर सुरक्षेला निर्माण होऊ शकणाऱ्या आव्हानांवर चिंता व्यक्त करण्यात आली होती.