

Agra Fort Rename Shivtirth Demand: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या ३६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाने आग्रा किल्ल्याचे नाव बदलून 'शिवतीर्थ' करण्याची मागणी केली आहे. याबाबतच्या मागणीचे पत्र केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे देण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे पाटील यांनी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.
मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलं की, 'छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा किल्ल्यावरून सुटका झाली होती. आमती मागणी आहे की आग्रा किल्ल्याला शिवतीर्थ असं नाव द्यावं. हा किल्ला १७ ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस निःशुल्क खुला ठेवावा.
ते पुढे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. ते अटक पासून कटकपर्यंत आहेत. त्यामुळं १७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात यावा.
दरम्यान, सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी आपल्या मागणीला चांगला प्रतिसाद दिला असून आपण हे करू असं आश्वासन देखील दिलं आहे असे संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितलं.
आग्रा किल्ल्याचे नाव बदलून 'शिवतीर्थ' करा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तसेच १७ ऑगस्ट ला आग्रा किल्ल्यावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा 'राष्ट्रीय कार्यक्रम' म्हणून घोषित करावा.
दरवर्षी १७ ऑगस्ट ला आग्रा किल्ल्यात येणाऱ्या शिवप्रेमींना मोफत प्रवेश देण्यात यावा, अशीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.