

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ॲप आणि वेबसाइट मंगळवारी (दि. ३१) पुन्हा एकदा डाउन झाली. IRCTC ॲप आणि वेबसाइटला आउटेजचा सामना करण्याची डिसेंबरमधील ही तिसरी वेळ आहे. हजारो यूजर्संना IRCTC प्लॅटफॉर्मवर लॉगिंग करण्यात अडचणी आल्या. अनेकांना त्यांची तिकीट खरेदीही करता आली नाही. सकाळी १० च्या सुमारास जेव्हा अनेकांनी ‘तत्काल’ तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न केला; तेव्हा त्यांना आउटेजची समस्या जाणवली. याचा फटका प्रवाशांना बसला.
याबाबत सोशल मीडियावर लोकांनी नाराजी व्यक्त करत तक्रारी नोंदवल्या. एका यूजरने X वर लिहिले की, “#IRCTC ॲप आणि वेब दोन्हीही क्रॅश झाले. कॅप्चा सर्व्हर क्रॅश झाला आहे." दुसऱ्या एका यूजरने शेअर करत म्हटले आहे, “तत्काल बुकिंगच्या आधी IRCTC ची यंत्रणा डाउन झाली. आणखी कोणाला अशी समस्या जाणवली का? #IRCTC #TatkalBooking," असा सवाल करत त्याने एरर मेसेजीसचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
आउटेज ट्रॅकिंग सर्व्हिस डाउनडिटेक्टरवर सकाळच्या सुमारास आयआरसीटीसी आउटेजबाबत तक्रारी नोंद झाल्या. या प्लॅटफॉर्मनुसार, सुमारे १,२०० लोकांनी या समस्येचा सामना केल्याची नोंद केली आहे. यातील ४६ टक्के लोकांना वेबसाइटवर समस्या जाणवली. ४२ टक्के लोकांना ॲपवर अडचण आली.
या महिन्यात याआधीही दोनवेळा IRCTC ची बुकिंग यंत्रणा ठप्प झाली होती. २६ डिसेंबर रोजी वेबसाइट आणि ॲप दोन्हीही दुरुस्तीमुळे दीड तासांसाठी डाउन झाले होते. ९ डिसेंबर रोजी यूजर्संना एका तास तिकीट बुकिंग करण्यात अडचण जाणवली होती.