

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच आज (दि.४) पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले आहे. त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारींवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच पोलीस महासंचालक शुक्ला यांची तत्काळ बदली करण्यात आली येत असून, पोलीस महासंचालकांचा पुढील पदभार सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना उद्या (दि.५) दुपारी १ वाजेपर्यंत पर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान मुंबईचे पोलिस आयुक्त फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव, राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही काम केले आहे. फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिले आहेत. ते मूळचे पुण्याचे आहेत. त्यांची अकोला येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक ही पहिली नेमणूक होती. त्यांनी 'कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये दक्षता विभागाचे संचालक म्हणूनही काम केले आहे.