

नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि वरिष्ठ कार्यकारी विनीत जैन यांच्यावर लाचखोरीचे आरोप नसल्याचे स्पष्टीकरण अदानी समूहाने दिले आहे. अदानी ग्रुपच्या अंतर्गत असलेल्या अदानी ग्रीन या कंपनीने स्पष्टीकरण जारी करुन आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र, इतर तीन आरोप आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने सांगितले की, न्याय विभागाच्या आरोपात पाच प्रकरणांचा समावेश आहे. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरील विविध मीडिया हाऊसने प्रकाशित केलेले अहवाल चुकीचे आहेत, असे कंपनीने सांगितले आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्याचा कोणताही पुरावा सादर केला नाही, असे समूहाने म्हटले आहे.
अमेरिकेची चुकीची कृती आणि अविचारी खोट्या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय प्रकल्प रद्द करणे, आर्थिक बाजारावर परिणाम होणे आणि धोरणात्मक भागीदार, गुंतवणूकदार आणि जनतेकडून अचानक होणारी तपासणी यासारखे महत्त्वपूर्ण परिणाम भारतीय समूहावर झाले आहेत, असे अदानी निवेदनात म्हटले आहे. यूएसच्या आरोपानंतर ११ सूचीबद्ध कंपन्यांमध्ये बाजार भांडवलात सुमारे ५५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. असे त्यात म्हटले आहे.
अदानी समूह हा भारतातील सर्वात मोठा पायाभूत सुविधा पुरवणारा समूह आहे जागतिक ऊर्जा आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर समूहाचे योगदान आहे, असे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, भारतीय समूह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार करत आहे. आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, इस्रायल, ऑस्ट्रेलिया इत्यादी अनेक यूएस आणि चीनी कंपन्यांशी थेट स्पर्धा करत आहे, असे समूहाने म्हटले आहे.