

Covid Cases Rise : काही महिन्यांनंतर पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशभरातील रुग्णांची संख्या २,७१० वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आहेत, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या २,७१० वर पोहोचली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक संसर्ग केरळमध्ये झाला आहे. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २५ मे रोजी कोरोना रुग्णसंख्येत पाच पटीने वाढ झाली. रुग्णसंख्येने १,००० चा टप्पा ओलांडला होता.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये १,१४७ कोरोना रुग्णांची नोंद झालीआहे. महाराष्ट्र (४२४), दिल्ली (२९४) आणि गुजरात (२२३) रुग्णसंख्या आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी १४८ प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये ११६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात दोन तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
या वर्षी दिल्लीत कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राजधानीत ५६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत कोरोनाचे एकूण २९४ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा सौम्य आहे. परंतु त्याचा परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णावर होत आहे. दरम्यान, गाझियाबाद जिल्ह्यात पाच नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १९ झाली आहे.
काेराेना रुग्णसंख्येच्या वाढत्या रुग्णांबाबत मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, कोरोना विषाणूची प्रकरणे सरकारच्या लक्षात आहेत. रुग्णालयांमध्ये पूर्ण व्यवस्था आहे. नागरिकांसाठी सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. काळजी करण्याची गरज नाही.