CJP Delhi Protest
दिल्ली: दिल्ली पोलिसांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे प्रमुख अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली आहे. या तिघांना दिल्ली पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते, परंतु त्यांची अधिकृत अटक आज सकाळी करण्यात आली. त्यांना आज न्यायाधीशांसमोर हजर केले जाणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) फोडलेल्या डरकाळीने शनिवारी राजधानी दिल्ली अक्षरशः हादरली. या आंदोलनाच्या निमित्ताने राजधानीच्या रस्त्यांवर संघर्ष दिसून आला. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच आंदोलक व त्यांच्या नेत्यांची धरपकड करीत शेकडो जणांना ताब्यात घेतले. 'सीजेपी'चे प्रमुख अभिजित दीपके व त्यांचे सहकारी सौरव दास, आशुतोष रांका यांना शनिवारी दिल्लीत दाखल होताच विमानातच ताब्यात घेण्यात आले.
अभिजित दीपके, सौरख दास आणि आशुतोष रांका यांना विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच पोलिस पथकाने विमानात प्रवेश करत त्यांना ताब्यात घेत असल्याची सूचना दिली. यावेळी गोंधळामुळे उशीर होत असल्याने काही प्रवाशांनी दीपके व दास यांना खडेबोल सुनावले. दरम्यान, नंतर पोलिसांनी आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी मदत करण्याची तयारी दीपके यांना दाखवली. दरम्यान, काल त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली असून दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल.
शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना सीआरपीसीच्या कलम १०७/५१ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करत अटक केली आहे. या तिघांना दिल्ली कॅन्ट येथील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले जाईल.
दीपके यांनी 'एक्स'वर शुक्रवारी रात्रीच व्हिडीओ रेकॉर्ड करून माझ्या अटकेनंतर अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू ठेवण्याचा संदेश समर्थकांना दिला होता. यानुसार पक्षाने नंतर अजिंक्य शिंदे यांच्याकडे आंदोलनाची धुरा सोपवली.