नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -
आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे समजते. फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ता असलेल्या दिल्लीत लक्ष केंद्रित करण्यावर आम आदमी पक्षाचा भर आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला अपेक्षित यश संपादन करता आले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये केवळ एक जागा मिळाली तर हरियाणामध्ये तीही मिळवता आली नाही, असे असले तरी आम आदमी पक्षाच्या या निर्णयाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मात्र बळ मिळणार आहे.
आपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीतील मत विभाजन टाळावे, एकजुटीने निवडणुकीला सामोरे जावे, हाही आम आदमी पक्षाचा उद्देश आहे. असे केल्यास दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीतील घटकपक्ष ताकदीने सोबत राहतील, असेही आपला वाटते. मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम आदमी पक्षाने २४ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यापैकी २३ उमेदवारांची अमानत रक्कमही गमभावी लागली होती.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत ९० पैकी ८९ जागा आम आदमी पक्षाने लढवल्या होत्या. हरियाणाच्या निवडणुकीपुर्वी अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला होता. त्यांनी पुर्ण ताकदीने प्रचारही केला होता. तरीही एकही जागा आम आदमी पक्षाला मिळवता आली नाही. अनेक वचनांसह 'हरियाणा का बेटा' ही प्रचार मोहीम देखील आम आदमी पक्षाने राबवली होती. सगळे प्रयत्न करूनही आम आदमी पक्षाला दोन टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली. त्यामुळे इतर राज्यांमध्ये ताकद खर्ची घालण्यापेक्षा हाती असलेले राज्य टिकवण्यासाठी ताकद लावावी, असे आम आदमी पक्षाला वाटते.