

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
दिल्लीतील आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीने सोमवारी (दि.2) ताब्यात घेतले. ईडीने सकाळी त्यांच्या घरावर छापा टाकून ही कारवाई केली. याबाबत आमदार खान यांनी स्वतः एका व्हिडिओद्वारे माहिती दिली. शोध वॉरंटच्या नावावर ईडीने मला ताब्यात घेतले आहे. 'मी त्यांच्या प्रत्येक नोटीसला उत्तर दिले आहे. मात्र हे लोक गेल्या दोन वर्षांपासून मला सतत त्रास देत आहेत, तरीही आम्ही झुकणार नाही,' असेही आमदार खान म्हणाले.
अलीकडेच दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणात नियुक्ती आणि त्याच्या मालमत्तेच्या कथित अनियमिततेच्या संदर्भात ईडीसमोर हजर न झाल्याबद्दल खान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यात आरोप केला होता की खान यांनी अटकपूर्व जामीन याचिका दाखल करून तपासापासून पळ काढला. दरम्यान, खान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली वक्फ बोर्डात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, ज्यामध्ये नियमांची पायमल्ली करण्यात आली तसेच आर्थिक अनियमिततेचाही आरोप आहे.