'आप'चे आणखी एक आमदार 'ईडी'च्‍या रडारवर, जाणून घ्‍या प्रकरण?

अमानतुल्ला खान यांच्‍या घरी ईडीचे पथक दाखल
'आप'चे आणखी एक आमदार 'ईडी'च्‍या रडारवर, जाणून घ्‍या प्रकरण?
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी आज (दि.२ सप्‍टेंबर) सकाळी सक्‍तवसुली संचालनालयाचे (ईडी) पथक दाखल झाले. दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बेकायदेशीर भरती आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आरोपांबाबत त्‍यांची चौकशी सुरु करण्‍यात आली आहे. दरम्‍यान, "ईडीचे लोक मला अटक करण्यासाठी माझ्या घरी आले आहेत.", अशी पोस्‍ट त्‍यांनी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X वर केली आहे.

अमानतुल्ला खान यांच्या दिल्‍लीतील घराबाहेर दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाचा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. अमानतुल्ला खान यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, आज सकाळीच हुकूमशहाच्या सांगण्यावरून त्याची कठपुतली ईडी माझ्या घरी पोहोचली आहे. मला आणि 'आप'च्या नेत्यांना त्रास देण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणे हा गुन्हा आहे का? ही हुकूमशाही किती दिवस चालणार?" ?"

अमानतुल्ला खान यांना अटक होईल : आपचा दावा

भाजपच्या राजकीय सूडबुद्धीमुळे खान यांना लक्ष्य केले जात आहे. आप नेत्यांनी ईडीच्या कारवाईचा कृतीचा निषेध करत अमानतुल्ला खान यांना अटक होईल, असा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे.मद्य धोरण प्रकरणात नुकतेच जामिनावर सुटलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले की, "ईडीचे हे एकच काम उरले आहे. भाजपविरोधात उठलेला प्रत्येक आवाज दडपणे. जे भाजपविरोधात बोलतात त्यांना अटक करा आणि तुरुंगात टाका.

काय आहेत खान यांच्‍यावर आरोप?

अमानतुल्ला खान हे 2018 ते 2022 दरम्यान दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्‍यक्ष होते. त्‍यांच्‍या काळात बेकायदेशीररीत्या कर्मचाऱ्यांची भरती आणि वक्फ बोर्डाच्या मालमत्ता चुकीच्या पद्धतीने भाड्याने दिल्याच्‍या आरोपांची ईडी चौकशी करत आहेत. या प्रकरणी खान यांची 12 तासांहून अधिक चौकशी केली आहे. खान यांनी बेकायदेशीर कृत्यांमधून मोठी रक्कम मिळवली. यातून त्‍यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी केली, असाही त्‍यांच्‍यावर आरोप आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news