नागेवाडीची भावना यादव केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंटपदी

नागेवाडीची भावना यादव केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंटपदी

विटा, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंटपदी नागेवाडीची भावना यादव हिची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून भावना सुभाष यादव या एकमेव मुलीची निवड झाली आहे. भावना यादव ही मुळची खानापूर तालुक्यातील नागेवाडीची, तिचे आजोळ पारे. त्यामुळे तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे.

भावनाचे वडील सुभाष यादव हे नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक झाले. सध्या ट्राफिक पोलीस म्हणून सुभाष यादव कार्यरत आहेत. अधुन मधुन ही मंडळी गावाकडे यात्रा जत्रेला, विविध कार्यासाठी येत असतात. गावाशी नाळ त्यांनी कधी तोडली नाही. भावनाने बी. एस्सी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी संपादन केली.एम. एस्सी बायो अँनालीटिकल सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

यूपीएससीसाठी तेलंगणा येथील आय. पी. एस अधिकारी महेश भागवत यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. राज्य लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा दोनवेळा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा एकदा उत्तीर्ण झाली होती, पण शारीरिक चाचणीत सुरुवातीला तिला थोडे अपयश आले होते. या असिस्टंट कमांडंट पदामध्ये देशभरातील एकूण १८७ उत्तीर्ण झाले भावनाने १४ वा क्रमांक पटकावला आहे.

मुलींमध्ये देशातून ती पहिली आली तर महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे. मैदानी आणि शारीरिक चाचणी तळेगावच्या सशस्त्र दलाच्या कॅम्पमध्ये  झाली. दोन्ही चाचणीत ती उत्तीर्ण झाल्यात्यांनतर दिल्ली येथील मुख्यालयात तिची मुलाखत झाली. लवकरच ती हैद्राबाद येथे वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहे.

सी.ए. पी. एफ. म्हणजे काय ?

देशामध्ये ज्या अति महत्वाच्या वास्तू, जागा, ठिकाणं आहेत, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्रीय सशस्त्र दलावर असते. राष्ट्रपती भवन, संसदेपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुपती देवस्थान, ताजमहल आदी अशा देशभरातील महत्वाच्या ठिकाणांची जबाबदारी या विभागाकडे असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news