उत्तरप्रदेशात प्रियांकाची गहरी चाल | पुढारी

उत्तरप्रदेशात प्रियांकाची गहरी चाल

ज्ञानेश्वर बिजले

काँग्रेसच्या गांधी परीवारातील प्रियांका यांच्या राजकीय गहिऱ्या चालींना तोंंड देताना उत्तर प्रदेशात राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या कुशल नेत्यांचीही भंबेरी उडाली आहे. तेथील परंपरागत जात-धर्माच्या राजकारणाला छेद देत प्रियांकाने वेगळीच वाट हाताळीत महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत केले. लडकी हूँ. लड सकती हूँ. ही त्यांची घोषणा लोकप्रिय ठरली, युवतींकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेसची संघटनात्मक सूत्रे सध्या प्रियांका गांधी यांच्या हाती सामावली आहेत. अहमद पटेल यांच्यानंतर त्या संघटनात्मक बाबींत दोन गटांतील वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. गेली दोन-तीन दशके लोकसभा निवडणुकीच्या काळात त्या उत्तरप्रदेशात येत असल्या, तरी त्यांचा प्रचार रायबरेली आणि अमेठी मतदारसंघापुरताच सिमित होता. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या सक्रीय राजकारणात उतरल्या. त्यांच्याकडे पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती.

प्रचाराची वेगळी शैली

पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या फुलपूर मतदारसंघापासून गंगा नदीतून नौकेतून त्यांनी त्यावेळी प्रचाराला प्रारंभ केला. नदीतून नावेतून प्रवास करीत लोकसभेच्या सहा मतदारसंघाशी संपर्क साधत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात पोहोचल्या होत्या. मतदारांच्या विशेषतः महिला मतदारांच्या गटागटांशी संवाद. थेट संपर्क. छोटेखानी सभा. मोदी सरकारवर थेट टीका. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना थेट भिडत वाचा फोडण्याची हातोटी. ही त्यांच्या प्रचाराची वैशिष्ट्ये.

कमकुवत काँग्रेस

उत्तरप्रदेश गेली तीन दशके मंडल – कमंडलच्या राजकारणात अडकलेला असताना, अस्तंगत होत चाललेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचा विडा उचलत प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेश पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच-सहा निवडणुकीत काँग्रेसला सहा-सात टक्के मतदान होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना समाजवादी पक्षाशी आघाडी करूनही सात जागा मिळाल्या. त्यापैकीही तीन-चार आमदार अन्यत्र निघून गेले. त्यामुळे एकूण 403 आमदारांपैकी काँग्रेसचा वाटा आहे तो केवळ तीन आमदारांचा. त्यामुळे, प्रियांका गांधी यांनी कितीही प्रयत्न केला, तरी काँग्रेस बलाढ्य विरोधकांसमोर फारसा वाढू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

लडकी हूँ, लड सकती हूॅ

अशा वातावरणात काँग्रेसला मजबूत करण्याचे आव्हान प्रियांकांनी स्विकारले, तेही एकटीच्या हिमतीवर. जात-धर्माच्या राजकारणाला छेद देत त्यांनी वेगळाच डाव मांडला. त्यांनी महिला शक्तीला साद घातली. महिलांना 40 टक्के जागा देण्याची त्यांची घोषणा विरोधी पक्षांच्या तंबूत घबराट उडवून गेली. त्यातच लडकी हूँ, लड सकती हूॅ. ही त्यांची घोषणा लोकप्रिय ठरली. तरुणींच्या मॅरेथॉन स्पर्धा, त्यांना मोपेड व टॅब भेट देण्याचा प्रारंभ. सत्तर महिला उमेदवारांची नावे निश्चित करण्याची तयारी. महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा. कोरोनामुळे जाहीर सभा रद्द करण्याचा पहिला निर्णय. सर्वच पातळीवर त्या आघाडी घेत आहेत.

लखीमपूरला रस्त्यावर आंदोलन

लखीमपूर येथे केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याने, पाचजण मृत्युमुखी पडले. मध्यरात्री दीड वाजता तेथे जाण्यासाठी प्रियांका गांधी पोलिसांशी वाद घालत असल्याचे चित्र सर्व देशाने पाहिले. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची तुलना सफाई कामगाराशी करताच, प्रियांकांनी थेट वाल्मिकी मंदीरात जाऊन तेथे झाडू मारला. मथुरेकडे पोलिस कोठडीत मृत्यू पावलेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला त्या भेटावयास निघाल्या, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. तेव्हा पोलिस कोठडीत त्यांनी साफसफाई केल्याचे व्हिडिओ झळकले. गेल्या वर्षी हाथरस येथील बलात्कार प्रकरणात त्यांनी केलेले आंदोलनही गाजले. भाजप सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून केवळ काँग्रेसच आंदोलन करीत असल्याचे ठसविण्यात प्रियांकाला यश मिळाले.

भाजप आणि सपमध्येच मुख्य लढत

काँग्रेसच्या सरचिटणीस व उत्तरप्रदेशच्या प्रभारी या नात्याने प्रियांका गांधी यांनी राज्यात दौरा सुरू केला. त्यांच्या सभांना प्रतिसादही चांगला मिळत असल्याने, सर्वांनाच काँग्रेसची दखल घ्यावी लागत आहे. सध्यातरी भाजप आणि सपा यांच्यातच मुख्य लढत असल्याचे चित्र आहे. सपाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या वेळी काँग्रेसशी, तर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली होती. मात्र, त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे, काँग्रेसची इच्छा असली, तरी यादव यांनी त्यांच्याशी आघाडी करण्याचे टाळले. बसपच्या नेत्या मायावती यांनी लोकसभा निवडणुकीनंतरच समाजवादी पक्षावर टीका करीत आघाडी तोडली होती. त्यामुळे, यादव यांनी विविध समाज घटकांच्या लहान पक्षांशी आघाडी करीत वेगळी मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

महिला व दलित मतदारांवर लक्ष

काँग्रेसने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे करीत महिला मतदार आणि दलित मतदार यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दलितांमध्ये निम्मी संख्या असलेल्या जाटव समाज बसपकडे आहे. त्याव्यतिरिक्त उर्वरीत दलित समाज गेल्यावेळी भाजपकडे गेला होता. त्या मतदारांवर, तसेच महिला मतदारांवर गांधी यांनी लक्ष केंद्रीत केल्याचा, त्याचा थेट फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या बाजूला यादव आणि मुस्लीम समाजाची मते समाजवादी पक्षामागे आहेत. त्याकडे प्रियांका लक्ष देत नाहीत. त्यामुळे, हे दोन्ही पक्ष परस्पराला पुरक राजकारण करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रियांका गांधी यांनी लडकी हूँ, लड सकती हूँ, असे लिहिलेेले रिस्ट बँड सुमारे एक कोटी तयार केले आहेत. विविध शहरात मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणाऱया मुली हे रिस्ट बँड, टीशर्ट परिधान करून स्पर्धेत उतरत आहेत. महिलांच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत. महिला उमेदवार प्रचारात उतरल्यानंतर, त्यांची दखल समाजाला घ्यावीच लागणार आहे.

महिला उमेदवार वाढणार

भाजपने 2017 त्या निवडणुकीत 46 महिलांना उमेदवारी दिली. त्यात 36 आमदार झाल्या. सपाने 31 जणींना तिकिटे दिली, एकजण जिंकली. बसपने 21 जणींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले, दोघी निवडून आल्या. काँग्रेसने लढविलेल्या 112 बारा जागांपैकी 11 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी दिली होती, त्यापैकी दोघी आमदार झाल्या होत्या. प्रत्येकांनी सर्वसाधारणपणे पाच ते 12 टक्के जागा महिलांना दिल्या होत्या. आता प्रियांका गांधी यांनी 40 टक्के म्हणजे 161 जागा महिलांना देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे, अन्य पक्षांनाही महिला उमेदवार वाढवावे लागतील, पण त्या निवडून येतील का, हा त्यांच्यापुढे प्रश्न उभा ठाकणार आहे.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्र सभा महिलांसाठी घेतली. ही दखल प्रियांका गांधी यांच्या चालीला शह देण्यासाठीच होती. मुख्यमंत्री योगी यांनीही गोरखपूरमध्ये ई-बस महिला चालकासोबत फोटो काढला. म्हणजेच प्रियांका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे दिसून येते.

त्रिशंकू विधानसभेत काँग्रेसला महत्त्व

गेल्या काही निवडणुकांत काँग्रेसची मतांची संख्या 50 लाखांपेक्षा थोडी अधिक आहे. ती संख्या एक कोटीपर्यंत वाढली, तरी वेगवेगळ्या मतदारसंघातील गणिते बिघडणार आहेत. गेल्या निवडणुकीत प्रियांकाचे एक वाक्य गाजले होते, हर लढाई जितने के लिए नही होती. बीजेपी को युपीमें हरानेके लिए आयी हूँ. भाजप व सपामध्ये जोरदार लढाई सुरू आहे. त्यात विधानसभा त्रिशंकू झाली, तर काँग्रेसला महत्त्व येईल. त्यांचे 2012 मध्ये 28 आमदार होते. त्यामुळे 15 ते 20 जागा जरी मिळाल्या, तरी काँग्रेसचे ते यशच असेल. तसेच, या प्रचाराचा फायदा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या वेळी होईल. त्यामुळे, प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी सुरु केलेल्या प्रयत्नाचा फायदा त्यांना देशपातळीवरही होईल.

Back to top button