

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात, असे सूचक वक्तव्य राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना पेव फुटले आहे.
सत्तार यांनी जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंबंधी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महामार्गाचे काम संथगतीने सुरू असून, रखडलेली कामे त्रुटी दूर करीत मार्गी लावण्याची विनंती त्यांनी भेटीदरम्यान केली. येत्या वर्षभरात महामार्गाचे कार्य मार्गी लागेल, असा विश्वास भेटीनंतर सत्तार यांनी व्यक्त केला. दरम्यान, भेटीनंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी युतीसंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा रंगली आहे.
गडकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून भाजप आणि शिवसेनेचे मनोमिलन घडवून आणू शकतात. गडकरी थेट बोलतात, सत्य बोलतात आणि ते कुणाला भीत नाहीत. तर उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करीत आहेत. नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही; तर देशाचे नेते आहेत. त्यांनी ठरवले तर शिवसेना-भाजप युतीचा पूल ते बांधू शकतात, असे सत्तार म्हणाले.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात
भाजप-सेना युतीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ शकतात, असे सत्तार म्हणाले. रश्मी ठाकरे या उत्तम प्रकारे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात. त्यांची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून आहे. आज त्या पडद्यामागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. परंतु, त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बर्यापैकी माहिती असते, असेही सत्तार म्हणाले.