

नवी दिल्ली/बंगळूर/डेहराडून : वृत्तसंस्था : 'बुल्लीबाई अॅप' च्या माध्यमातून विशिष्ट समुदायातील महिलांचे आक्षेपार्ह फोटो अपलोड करून त्यांची बोली लावली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आल्याने मोठे वादंग उभे राहिले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवून प्रकरणातील आणखी एका मुख्य सूत्रधारास उत्तराखंड राज्यातील रुद्रपूर येथून मंगळवारी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील ही दुसरी मुख्य सूत्रधार एक महिला आहे.
'बुल्लीबाई अॅप' शी संबंधित तीन अकाऊंट ही महिला स्वत: हाताळत होती, हे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. तिचे नाव श्वेता सिंग (वय 18) आहे.
याप्रकरणी मुंबई आणि दिल्लीतील पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले होते. काही तांत्रिक पुरावे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने याआधी सोमवारी बंगळूर येथून एका 21 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले होते. हा तरुण अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षाला आहे. तरुणाचे नाव विशाल कुमार असल्याचे सांगण्यात येते. त्याची कसून चौकशी सुरू आहे. सायबर सेलचे उपायुक्त स्वत: त्याची चौकशी करत आहेत. रुद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आलेली महिला ही विशाल कुमार याच्या संपर्कातील आहे.
खात्याच्या नावात बदल
विशाल कुमार याने बनावट नावाने या अॅपवर अकाऊंट उघडले होते. वर्षअखेरीस 31 डिसेंबरला अकाऊंटवरील नाव त्याने बदलले, असे तपासातून समोर आले आहे.
तेढ निर्माण केल्याचा गुन्हा
वरील प्रकरणात मुंबईसह दिल्लीतील पोलिस ठाण्यांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक आधारावर दोन समुदायांतील भेदभाव वाढविणे, जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावणे, पाठलाग करणे, विनयभंग, अब्रूनुकसानी तसेच आयटी कायद्यानुसार मुंबई पोलिसांनी हे प्रकरण दाखल केले आहे.
मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमध्ये मंगळवारी आरोपी महिलेस ट्रांझिट रिमांडवर आपल्या ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण केली. बुधवारी तिला मुंबईला आणण्यात येईल. आधी बंगळूरहून अटक केलेल्या संशयिताचे पूर्ण नाव विशाल कुमार झा असून, तो बिहारचा मूळ रहिवासी आहे. विशाल झा याला मुंबईतील बांद्रा मेट्रोपॉलिटन न्यायालयात हजर करण्यात आले असता अर्ध्या तासाच्या सुनावणीअंती त्याला 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांची कारवाई
* दिल्ली पोलिसांनी 'डॉजी अॅप्लिकेशन'च्या डेव्हलपरबाबत 'गिटहब प्लॅटफॉर्म'कडून माहिती मागविली आहे.
* दुसरीकडे ट्विटरवरून संबंधित फोटो व मजकूर प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करण्यास वा हटविण्यास सांगण्यात आले आहे.
* अॅपच्या बाबतीत सर्वात आधी ट्विट करणार्या अकाऊंट हँडलरची (यूझर) माहितीही ट्विटरकडे मागितली आहे.