नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : सरकारी कार्यालयांतील कर्मचार्यांची उपस्थिती 50 टक्केच असायला हवी, उर्वरित कर्मचार्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्यात यावे, असे निर्देश नव्या नियमावलीत केंद्र सरकारने दिले आहेत. (corona guideline)
देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचे प्रमाणही वाढू लागल्यामुळे केंद्राकडून सरकारी कर्मचार्यांसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.
सरकारी अधिकारी अथवा कर्मचार्यांची गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रक ठरवण्याच्या सूचनाही केंद्राकडून सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत त्यांना कार्यालयात बोलावू नका, असे या नियमावलीत सुचविण्यात आले आहे. दिव्यांग कर्मचार्यांनाही कार्यालयात न बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्भवती महिलांनाही कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मंगळवारपासून बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेजेस, सलून, उद्याने बंद ठेवण्यात येतील. रात्रीची संचारबंदी असणार आहे. हरियाणातही शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांच्या नियमांबाबत देशात समानता असावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. येथे सोमवारी लसीकरणाचा प्रारंभ झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 15 ते 18 या वयोगटांतील मुले हा खूप फिरणारा गट आहे. यामुळे या गटांतील मुलांमध्ये लसीकरणाची खूप गरज होती. याबाबत माझी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा झाली. या चर्चेत सर्व मुद्दे मांडण्यात आले, असे टोपे यांनी सांगितले.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांच्या मुख्य सचिवांना लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयोगाने सोमवारी दिले. मणिपूरमध्ये लसीकरण अभियान संथगतीने सुरू आहे. त्याबाबत आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. राज्यात पहिला डोस घेणार्यांचे प्रमाण कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने सर्व राज्यांना पत्र पाठवून लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर तसेच गोव्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असतानाही कोरोना नियमांचे पालन करीत निवडणुका घेतल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
येवला : तालुक्यातील पाटोदा येथे एका 16 वर्षांच्या विद्यार्थ्याला कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड लस दिली गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आरोग्य यंत्रणेच्या या कारभारामुळे संबंधित पालक संतप्त झाले. दरम्यान, या विद्यार्थ्याची प्रकृती ठीक असून, त्याला काहीही त्रास झालेला नाही. जिल्ह्यात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले.