नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : साहित्य अकादमी पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यात मराठीसाठीचा मुख्य पुरस्कार किरण गुरव यांच्या 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी' या कथासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. लेखक प्रणव सखदेव यांच्या 'काळे करडे स्ट्रोक्स' या कादंबरीसाठी युवा साहित्य पुरस्कार आणि संजय वाघ यांच्या 'जोकर बनला किंगमेकर' या बालकादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. कथाकार किरण गुरव हे सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मुख्य पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये एक लाख, ताम्रपट आणि शाल असे आहे. युवा आणि बाल पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये 50 हजार आणि ताम्रपट असे आहे. या निमित्ताने मराठीसाठी तिघांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या तिन्ही लेखकांचे अभिनंदन केले आहे.
अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्कार 20 भाषांमधील साहित्यिकांना, तर 22 प्रादेशिक भाषांमधील बालसाहित्य आणि युवा साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
हिंदीसाठी दया प्रकाश सिन्हा (सम्राट अशोक : नाटक), इंग्रजीसाठी नमिता गोखले (थिंग्स टू लीव बिहाइंड : कादंबरी) आणि पंजाबीसाठी खालिद हुसैन यांच्या सूलां दा सालण या कथासंग्रहासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सात कवितासंग्रह, पाच कथासंग्रह, दोन कादंबर्या, दोन नाटके, जीवन चरित्र, आत्मचरित्र, महाकाव्य आणि समीक्षा विभागात प्रत्येकी एक असे 2021चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. शिवाय युवा आणि बालसाहित्य पुरस्कार विजेत्यांची नावेही जाहीर करण्यात आली. इंद्रजित भालेराव, नागनाथ कोत्तापल्ले आणि भास्कर चंदनशिव या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार निवडीच्या परीक्षक मंडळात समावेश होता.
आयुष्यातील महत्त्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा सन्मान – सोनाली नवांगुळ
मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा मानाचा अनुवादाचा पुरस्कार प्राप्त करणे हा आयुष्यातील महत्त्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा सन्मान असल्याच्या भावना सोनाली नवांगुळ यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केल्या. अपंग व्यक्ती दर्जेदार साहित्यनिर्मिती करू शकत नाही, अशा दृष्टिकोनातून बघितले जात नाही उलट त्यांना सहानुभूती दिली जाते. मात्र, आपल्या मनात असले व आपल्या भाषेवर प्रेम असेल तर अतिशय उत्कृष्ट कार्य आपण करू शकतो व त्याची शाबासकीही मिळू शकते हा आत्मविश्वासच या पुरस्काराने दिल्याचे त्यांनी सांगितले.
संस्कृत ही भारताचा आत्मा व्यक्त करणारी भाषा : डॉ. मंजुषा कुलकर्णी यांची पुरस्कार स्वीकारताना प्रतिक्रिया
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेले समाज कार्य हे संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्मकथनाचा संस्कृत भाषेत अनुवाद करणे महाखडतर असे कार्य होते. संस्कृत ही भारताचा आत्मा व्यक्त करणारी भाषा असून या भाषेतून व्यक्त झालेल्या कलाकृती चिरकालीन व अजरामर होतात म्हणूनच डॉ. प्रकाश आमटे यांच्या 'प्रकाशवाटा' या आत्मकथनाचा 'प्रकाशमार्गा:' हा संस्कृत भाषेतील अनुवाद करण्याचे खडतर कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. या कार्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचा व संस्कृततज्ज्ञांचे आभारही मानले. डॉ. कुलकर्णी यांची 25 पुस्तके प्रकाशित असून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले आहे. लेखिका, कवियित्री, व्याख्याता आणि निवेदिका म्हणून त्या प्रसिध्द आहेत, तसेच त्यांनी नाट्यप्रयोगही केले आहेत.
अन्य पुरस्कार विभाग आणि विजेते असे
काव्यसंग्रह : मोदाय गाहाय (बोडो), संजीव वेरेंकर (कोकणी), हृषिकेश मल्लिक (उडिया), मीठेश निर्मोही (राजस्थानी), विंध्येश्वरी प्रसाद मिश्र-विनय (संस्कृत), अर्जुन चावला (सिंधी) आणि गोराति वेंकन्ना (तेलगू)
कथासंग्रह : राज राही (डोगरी), निरंजन हान्सदा (संताली) आणि अम्बई (तमिळ) * कादंबरी : अनुराधा शर्मा पुजारी (आसामी)
नाटक : ब्रत्य बसू (बांगला)
जीवन चरित्र : डी.एस. नागभूषण (कन्नड)
महाकाव्य : छविलाल उपाध्याय (नेपाळी)
आत्मचरित्र : जॉर्ज ओनाक्कूर (मल्याळम)
समीक्षा : वली मोहम्मद असीर किश्तवारी (काश्मिरी).