नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्ली ते उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या शहरांना जोडणारा "एक्सप्रेस वे' आगामी काळात उभारला जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्लीनजीकच्या गाझियाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान केली. येत्या दहा-बारा दिवसात या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होईल, असेही ते म्हणाले. (delhi lucknow expressway)
केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम हाती घेतले जाणार आहे, असे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, दिल्ली-लखनौ 'एक्सप्रेस वे' दोन टप्प्यात पूर्ण होईल.
यामुळे दिल्ली-लखनौ दरम्यानचे अंतर तीन तासात कापता येईल. लखनौ ते कानपूर आणि कानपूर ते गाझियाबाद अशा दोन टप्प्यात काम होईल. पुढील पाच वर्षात उत्तर प्रदेशातील रस्ते अमेरिकन व युरोपियन दर्जाचे बनवले जाणार आहेत.
याच कार्यक्रमात गडकरी यांनी केंद्रातले मोदी सरकार गाड्यांच्या वेगाबाबत नवीन नियम बनवणार असल्याचे सांगितले. नियमाअंतर्गत कोणी व्यक्ती वाहतुकीचे नियम तोडताना आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
लवकरच महामार्ग आणि एक्स्प्रेस वे वरील वेगाबाबत नवीन नियम करण्यात येणार आहे. नियम कोणी मोडला तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल, जे पुरावे बनतील, त्याआधारे एफआयआर दाखल होईल, असे गडकरी यांनी सांगितले.