

पुढारी ऑनलाईन : काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत मध्यान्ह भोजनाची वेळ होती, नऊ वर्षांची एक चिमुकली आपला डबा उघडून जेवायला बसणार, इतक्यात ती अचानक खाली कोसळली.
सिकर जिल्ह्यातील दांता रामगडमधील एक दुःखद घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता जेवणाची सुट्टी झाली होती. सर्व मुले आपापल्या वर्गात जेवत होती. यादरम्यान आदर्श विद्या मंदिर शाळेत शिकणारी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी प्राची तिचा डबा उघडत असताना अचानक जमिनीवर कोसळली व बेशुद्ध पडली. शाळेतील कर्मचारी तातडीने मुलीजवळ आले तिला घेतली आणि तिला दांता रामगड सीएचसीमध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी मुलीला सिकर एसके रुग्णालयात जाण्याची तयारी केली.
पण जेव्हा मुलीला रुग्णवाहिकेत हलवले जात होते तेव्हा तिला तिसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. हृदयविकारामुळे झालेल्या या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.
शाळेत डबा उघडताना हृदयविकाराच्या झटक्याने एका ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव प्राची असे आहे, ती आदर्श विद्या मंदिर शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या पोटच्या गोळ्याच्या अशा आकस्मिक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थी आणि परिसरात भीती व दुःखाचे वातावरण पसरले आहे.