

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
बेळगावसह प्रयागराज व कोलकाता पाठोपाठ आता लवकरच चेन्नई येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय अपुऱ्या मनुष्यबळामुळे बंद करण्यात येणार आहे. तथापि बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे आश्वासन केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय पूर्ववत बेळगाव येथे सुरू करावे, अशी मागणी नक्वी यांची भेट घेऊन केली. चेन्नई येथील कार्यालय सीमा भागातील लोकांसाठी किती अडचणीचे आणि त्रासदायक ठरत आहे, हे नक्वी यांना पटवून देण्यात आले.
तसेच ते कार्यालय कसे परत आणता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर नक्वी यांनी अपुऱ्या मनुष्यबळामुळे बेळगावसह प्रयागराज व कोलकता येथील भाषिक अल्पसंख्यांक आयोगाची कार्यालय बंद करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच लवकरच चेन्नई येथील कार्यालय बंद केले जाणार असल्याची माहिती दिली. त्यावर खासदारांनी बेळगावसह सीमाभागासाठी सदर कार्यालयाची किती गरज आहे हे पटवून दिल्यानंतर आयोगाचे पश्चिम विभागीय कार्यालय मुंबईत सुरू करण्याचे मंत्री नक्वी यांनी मान्य केले. मात्र त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्याला जागा उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले.
केंद्रीय मंत्री नक्वी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शिवसेना खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन कीर्तिकर, संजय जाधव, प्रतापराव जाधव, राजन विचारे, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाणे, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील माने, कलाबेन डेलकर तसेच सर्वोच्च न्यायालयातील ऍड. सुहास कदम यांचा समावेश होता.
हेही वाचा