आदर पूनावाला : तीन वर्षांपुढील मुलांना येत्या ६ महिन्यांत लस | पुढारी

आदर पूनावाला : तीन वर्षांपुढील मुलांना येत्या ६ महिन्यांत लस

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : येत्या सहा महिन्यांत तीन वर्षे व त्यापुढील वयोगटातील मुलांसाठी ‘सिरम’कडून लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी मंगळवारी दिली.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात पूनावाला बोलत होते. ‘कोवोव्हॅक्स’ असे या लसीचे नाव असून, तिची चाचणी सध्या मुलांवर सूरू आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यावर ती मुलांसाठी उपलब्ध करण्यात येईल.

सध्या ओमायक्रॉनची भीती आहे. त्यातच देशभरात रुग्ण सापडत असून, महाराष्ट्रात आतापर्यंत याचे २० रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रू वारी महिन्यात तिसरी लाट येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावर लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. मात्र, सध्याची लस ही १८ वर्षे व त्यापुढील लाभार्थ्यांना देण्यात येते. १८ वर्षांच्या आतील मुलांचे काय, हा प्रश्‍न त्या निमित्ताने उपस्थित झाला होता. याबाबत पूनावाला यांनी दिलासा दिला.

पूनावाला म्हणाले, कोवोव्हॅक्स या लसीच्या डोसची ३ वर्षे व त्यापुढील मुलांवर ट्रायल झाली असून त्याचे चांगले परिणाम त्यांच्यावर दिसून आले आहेत. या लसीची निर्मिती सिरमकडून करण्यात येत आहे. ती येत्या सहा महिन्यांत उपलब्ध असेल.

मुलांमध्ये कोरोनाची फार काही गुंतागुंत होत नाही, असे आतापर्यंतच्या अनुभवातून आढळून आले आहे. त्यामुळे मुलांमध्ये फारसे घाबरण्याचे कारण नाही. मुलांसाठी भारतात दोन कंपन्या लसनिर्मिती करत असल्याचेही पूनावाला यांनी सांगितले. ते म्हणाले, मुलांमध्ये या लसीच्या चाचणीचे कोणतेही चुकीचे परिणाम आढळून आले नसून, ते सुरक्षित आहेत. त्यामुळे ज्यावेळी शासनाकडून मुलांना लसीकरण करून घेण्याची घोषणा केली जाईल, तेव्हा तुम्ही त्यांना लस देऊ शकता.

कोवोव्हॅक्स मुलांसाठी सुरक्षित

कोवोव्हॅक्स ही लस मुलांसाठी सुरक्षित असून, चाचणीदरम्यान तिची मुलांना संसर्गापासून वाचवण्याबाबतची उपयुक्‍तता सिद्ध झालेली आहे. ओमायक्रॉनचा मुलांवर कसा परिणाम होईल, याबाबत विचारले असता ओमायक्रॉनचा मुलांवर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. मात्र, आतापर्यंतच्या अनुभवावरून त्यांना फारसा काही धोका नसल्याचे समोर आले आहे. त्यांची फुप्फुसे लवकर बरी होतात, असेही आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले.

Back to top button