हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी, जनरल रावत यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार | पुढारी

हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी, जनरल रावत यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशाचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत (cds bipin rawat) यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत केली. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्याकडे या दुर्घटनेच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे. सिंग हे हवाई दलाच्या प्रशिक्षण विभागाचे कमांडर आहेत.

दरम्यान, रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह केवळ चौघांची ओळख पटली असून, सर्वांचे पार्थिव सुपर हर्क्युलस विमानाने नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर रात्री आणण्यात आले. तामिळनाडूतील कुन्‍नूर येथे बुधवारी झालेल्या दुर्घटनेत हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात जनरल रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर 11 जणांचा समावेश आहे.

एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पी. एस. चौहान, स्क्‍वॉड्रन लीडर के. सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी. साई तेजा, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर दास, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर ए. प्रदीप आणि हवालदार सतपाल अशी अन्य मृतांची नावे आहेत. इतर मृतांची अद्यापही ओळख पटलेली नाही.

गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रावत तसेच इतर मान्यवरांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्‍त केला. यानंतर खासदारांनी दोन मिनिटांचे मौन पाळत मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर निवेदन करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल रावत यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती दिली. लष्करी तळ असलेल्या दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे रावत यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (cds bipin rawat)

तत्पूर्वी रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी 11 ते 2 पर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास अंत्ययात्रा काढण्यात येईल. कामराज मार्ग ते बरार चौकापर्यंत ही अंत्ययात्रा जाईल. तेथून दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात जनरल रावत यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल.

हेलिकॉप्टर उडताच 20 मिनिटांनी संपर्क तुटला; राजनाथ यांचे संसदेत निवेदन

राजनाथ सिंह यांनी बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेसंबंधीचे निवेदनही लोकसभेत केले. ते म्हणाले की, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांना घेऊन जाणार्‍या हेलिकॉप्टरने बुधवारी सकाळी 11.48 वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर 20 मिनिटांनी म्हणजे दुपारी 12.08 वाजता हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क तुटला.

त्यानंतर काही मिनिटांतच स्थानिक लोकांनी आगीने वेढलेले हेलिकॉप्टर कोसळताना पाहिलेे. स्थानिक लोक तसेच प्रशासनाने मदतीसाठी धाव घेतली. अपघात स्थळावरून सर्व लोकांना वेलिंग्टन येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला होता. या 13 जणांचे पार्थिव रात्री 8 च्या सुमारास दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले.

मृतदेह घेऊन जाणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्सवर पुष्पवृष्टी (cds bipin rawat)

वेलिंग्टन हॉस्पिटलमधून सर्वांचे पार्थिव चेन्‍नई रेजिमेंट येथे घेऊन जात असताना परिसरातील नागरिकांनी पार्थिव घेऊन जाणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्सवर फुलांचा वर्षाव करीत आदरांजली वाहिली. रेजिमेंट सेंटर येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जनरल रावत यांना अभिवादन करीत आदरांजली वाहिली.

शोकाकुल वातावरणात पंतप्रधानांची श्रद्धांजली

हेलिकॉप्टर अपघातात मृत जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह लष्करी अधिकार्‍यांचे पार्थिव घेऊन वायुसेनेचे सुपर हर्क्युलिस हे विमान गुरुवारी रात्री दिल्लीच्या पालम एअरबेसवर पोहोचले. एअर बेसवर पार्थिव येताच रावत यांच्या दोन्ही मुलींना अश्रू अनावर झाले. शोकाकुल वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस रावत यांच्या पार्थिवासमोर नतमस्तक होत श्रद्धांजली वाहिली.

इतर मृत अधिकार्‍यांच्या शवपेटींवर पुष्पचक्र अर्पण करीत पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. यात ओळख न पटल्याने नावे नसलेल्या शवपेट्यांचा समावेश होता. केवळ चार मृतदेहांची ओळख पटू शकल्याने उर्वरित मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटविली जाणार आहे. तोपर्यंत हे मृतदेह लष्कराच्या रूग्णालयातील शवागारात ठेवण्यात येणार आहे.

पंतप्रधानांसमवेत यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे, वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी तसेच नौदलाचे प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार यावेळी उपस्थित होते. तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबतच देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच लष्करातील आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी यावेळी रावत यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. रावत यांच्या कन्या किर्तिका आणि तारीणी यावेळी उपस्थित होत्या. पंतप्रधानांनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वांना पुष्पअर्पण करीत श्रद्धांजली अर्पित केली.संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट देखील यावेळी उपस्थित होते.

ब्लॅक बॉक्स, कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर ताब्यात

दुर्घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स विभागाचे पथक पोहोचले. घटनास्थळी ब्लॅक बॉक्स, फ्लाईट डेटा रेकॉर्डरसह कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर सापडला आहे. तो या पथकाने ताब्यात घेतला आहे. या विभागाचे संचालक श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी तपासणी करीत आहे.

Back to top button