…तर महापालिका निवडणूकही महाविकास आघाडीतर्फे लढूया : राजेश ­­­क्षीरसागर | पुढारी

...तर महापालिका निवडणूकही महाविकास आघाडीतर्फे लढूया : राजेश ­­­क्षीरसागर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी व भाजपच्या नगरसेविका जयश्री जाधव यांची पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड करण्यासाठी भाजपला आवाहन केले आहे.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आणि एकसंघ आहोत. गोकुळसह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढल्या. मग कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या झेंड्याखालीच लढूया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश ­­­क्षीरसागर यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेत
केले.

निवडणुकीसाठी ताकदीने तयारी; पण मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य क्षीरसागर म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी मत व्यक्त केले असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. परिणामी आपणास काहीवेळ वाट पहावी लागेल. कोणत्याही लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिलेले असते. त्यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींना पूर्ण कालावधी मिळायला पाहिजे.

पण आ. चंद्रकांत जाधव यांचे अकाली निधन झाले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मी यापूर्वी दोनवेळा नेतृत्व केले आहे. 2019 ला निवडणुकीत पराभव झाला असला तरी दुसर्‍या दिवसापासून जनसेवेला सुरुवात केली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. किंबहुना आजही निवडणूक लागली तरीही माझी तयारी आहे. परंतु माणुसकीपेक्षा राजकारण श्रेष्ठ नाही. मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील तो मान्य असेल. लवकरच माझी भूमिका स्पष्ट करेन.

महाविकास आघाडीतून शिवसैनिकांत अन्यायाची भावना

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुतांश निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविल्या आहेत. यात गोकुळसह इतर निवडणुकांचा समावेश आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांचीही जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेवर अन्याय होत आहे, असे चित्र कार्यकर्त्यांत निर्माण होत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाच वर्षे एकत्र राहायचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकही महाविकास आघाडीने एकत्र लढणे गरजेचे आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button