उत्तर भारतात उष्माघाताचे 178 बळी

उत्तर भारतात उष्माघाताचे 178 बळी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत उष्म्याचा तडाखा कायम असून, गेल्या 48 तासांत या महानगरीत उष्माघाताने 33 जणांचा मृत्यू झाला आहे. लगतच्या नोएडामध्ये 9 जणांना जीव गमवावा लागला. नोएडासह उत्तर प्रदेशात गेल्या 48 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात एकट्या उत्तर प्रदेशात 119 मृत्यू झाले असून, उत्तरेकडील अन्य राज्ये मिळून ही संख्या 178 वर गेली आहे.

बुधवारीही मृत्यूच्या घटना घडल्या असून, मंगळवारची रात्र ही दिल्लीत 12 वर्षांतील सर्वात उष्ण होती. रात्रीचे तापमान 33.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नोएडातील नऊपैकी पाच मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही.

100 जणांना उन्हामुळे चक्कर

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सेक्टर-125 येथील खासगी विद्यापीठाच्या गेट क्रमांक पाचजवळ कचरा गोळा करणार्‍या तरुणाचा मृतदेह आढळून आला. सेक्टर 1 येथील टांकसाळीजवळ सायंकाळी 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. उन्हामुळे चक्कर येऊन पडलेले 100 हून अधिक रुग्ण दिल्लीच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये (38) पोहोचत आहेत.

11 राज्यांत अलर्ट

हवामान विभागाकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासह उत्तरेकडील 11 राज्यांमध्ये हिटवेव्हचा इशारा देण्यात आला होता. अनेक राज्यांत ठिकठिकाणी पारा 46 ते 50 अंशांदरम्यान पोहोचला. दिल्लीतील तापमानाचा पारा 51 अंशांवर गेला होता. दिल्लीमध्ये 12 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

रुग्णालयांत उष्माघात कक्ष

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी हिटवेव्हच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांत खास कक्ष व रुग्णांवर तातडीने उपचारांसाठी विशेष युनिट स्थापन करण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news