भारतीय कोट्यधीशांचे ‘या’ देशात स्थलांतर! ‘वेल्थ मायग्रेशन’चा धक्कादायक रिपोर्ट

भारतीय कोट्यधीशांचे ‘या’ देशात स्थलांतर! ‘वेल्थ मायग्रेशन’चा धक्कादायक रिपोर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट मायग्रेशन ॲडव्हायझरी फर्म हेन्ले अँड पार्टनर्सचा वार्षिक खाजगी संपत्ती स्थलांतर अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात ज्या व्यक्ती इतर कोणत्याही ठिकाणी किमान 10 लाख डॉलर्स किंवा 8.2 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सक्षम आहेत अशा व्यक्तींना अति श्रीमंत श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या गुंतवणुकीत त्यांची मालमत्ता, रोख रक्कम, शेअर्स यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. याच अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील सुमारे 4300 अब्जाधिश देश सोडून अन्य देशात स्थलांतर करू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातील बहुतांश लोक युएईमध्ये स्थायिक होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ही संख्या गेल्या वर्षी 5,100 होती.

भारतात श्रीमंताची संख्या वाढत चालली आहे. मात्र असे असले तरी आपला देश सोडून जाणाऱ्या श्रीमंत कोट्यधीशांचीही संख्या वाढत आहे. मागच्यावर्षी 5,100 कोट्यधीश भारतीय नागरिक देश सोडून इतर देशांत स्थलांतरित झाले होते, असा अहवाल याच संस्थेने दिला होता.

जगभरातील 1 लाख 28 हजार कोट्यधीश नागरिक 2024 या वर्षात स्थलांतरीत करण्याच्या तयारीत आहेत. युएइ आणि युएसए या देशांमध्ये कोट्यधीश स्थलांतरित होण्यास प्राधान्य देत आहेत. स्थलांतर करण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य, करांमध्ये सवलत, निवृत्तीनंतरचे आयुष्य, नव्या व्यावसायिक संधी, चांगल्या जीवनमानाची अपेक्षा, मुलांसाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी, आरोग्याच्या सुविधा आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य जगण्यासाठी कोट्यधीश स्थलांतरित करत आहेत.

वेगाने अर्थव्यवस्थेत प्रगती होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. चीन आणि युक्रेननंतर कोट्यधीशांचे स्थलांतर होणाऱ्या देशांमध्ये भारताचा आता तिसरा क्रमांक लागत आहे. तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताने चीनलाही मागे टाकले आहे. मात्र कोट्यधीशांच्या संख्येत भारत अजूनही चीनच्या मागे आहे. भारतात चीनपेक्षा 30 टक्के कमी कोट्यधीश आहेत. चीनमधून यंदाच्या आर्थिक वर्षात सर्वाधिक 15,200 करोडपती देश सोडती असा अंदाज आहे. साल 2023 या आर्थिक वर्षात चीनमधून 13,800 कोट्यधीशांनी देश सोडला होता. दक्षिण कोरीयातून 1,200 कोट्यधीश लोक गाशा गुंडाळतील असा अंदाज आहे. वर्ष 2023 मध्ये 800 द. कोरियन कोट्यधीश परदेशात वसले आहेत.

अहवालात असे म्हटले आहे की, 'भारत दरवर्षी हजारो कोट्यधीशांना गमावत आहे. यातील बरेच जण युएईमध्ये स्थायिक होण्यास प्राधान्य देत आहेत. कोट्यधीशांच्या स्थलांतराच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर असेल. त्यानंतर चीन आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो.

ब्रिटनमधून देखील वर्ष 2023 मध्ये 4,200 कोट्यधीशांनी देश सोडला होता. आता यंदा 2024 मध्ये त्याहून दुप्पट म्हणजे 9,500 कोट्यधीश लोक देश सोडतील असा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. 2022 मध्ये ब्रिटनमधून 1,600 कोट्यधीश लोक परकीय देशात स्थायिक झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news