व्लादिमीर पुतीन म्हणाले, भारत ही जगाच्या पाठीवरील महान शक्‍ती | पुढारी

व्लादिमीर पुतीन म्हणाले, भारत ही जगाच्या पाठीवरील महान शक्‍ती

नवी दिल्ली ; पीटीआय : भारत ही जगाच्या पाठीवरील एक महान शक्‍ती आहे. रशिया आणि भारतादरम्यान गेली अनेक दशके मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला भारत हा आमचा सच्चा मित्र आहे. भारताबरोबरचे हे मैत्रीबंध आणखी मजबूत होतील, असा द‍ृढ विश्‍वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बोलून दाखवला.

पुतीन सोमवारी भारत भेटीवर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे हैदराबाद हाऊस येथे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी ही दोन्ही देशांसमोरची आव्हाने आहेत, अशी चिंता व्यक्‍त करून या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भविष्यात दोन्ही देश सहकार्य आणि समन्वय साधत राहतील, असे व्लादिमीर पुतीन म्हणाले.

भारत भेटीमुळे मला खूप आनंद झाल्याचे सांगून पुतीन यांनी पर्यावरण, व्यापार, गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आणि रशिया यांच्यातील वाढत्या सहकार्याचा उल्लेख केला. सध्या दोन्ही देशांदरम्यानची परस्पर गुंतवणूक सुमारे 38 अब्ज एवढी आहे. रशियाकडून भविष्यात आणखी गुंतवणूक करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

गेल्या काही दशकांमध्ये जगाने अनेक बदल, विविध प्रकारची भू-राजकीय समीकरणे आणि परिवर्तने अनुभवली. परंतु भारत आणि रशियाची मैत्री कायम राहिली. पुतीन यांच्या भेटीने भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांबद्दलची त्यांची वैयक्‍तिक बांधिलकी दिसून येते. दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होत आहे, असे मोदी म्हणाले.

तुमची भारत भेट ही भारतासोबतच्या संबंधांबद्दलच्या तुमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे, असे उद‍्गारही मोदी यांनी पुतीन यांना उद्देशून काढले.

संरक्षणमंत्र्यांशी चर्चा

मोदी आणि पुतीन यांच्या भेटीपूर्वी राजधानी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रशियाचे संरक्षणमंत्री जनरल सर्गेई शोहगू तसेच परराष्ट्रमंत्री सर्गी लेवरोव यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली. सामरिकद‍ृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने यावेळी चर्चा करण्यात आली.

Back to top button