winter session : खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांचा गदारोळ सुरूच | पुढारी

winter session : खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांचा गदारोळ सुरूच

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेत गैरवर्तनप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 12 खासदारांचे निलंबन (winter session) मागे घ्यावे, या मागणीवरून सोमवारी विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर सदनाचे काम चारवेळा आणि नंतर संपूर्ण दिवसासाठी स्थगित केले गेले.

दोनवेळा कामकाज ठप्प झाल्यानंतर दुपारी दोन वाजता बैठक कामकाज सुरू झाले. यावेळी उपसभापती हरिवंश यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी दिली. खरगे यांनी 12 निलंबित खासदारांना सदनात येण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ते चर्चेत भाग घेऊ शकतील, अशी विनंती केली. (winter session)

त्यावर हरिवंश यांनी सभापती आणि विरोधी नेत्यांनी परस्पर चर्चेतून मार्ग काढावा, असे यापूर्वीच सांगितल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर काही विरोधी खासदार घोषणाबाजी करत उपसभापतींच्या आसनाजवळ आले. त्यामुळे गदारोळास सुरुवात झाली. त्यामुळे कामकाज तीन वाजेपर्यंत स्थगित केले गेले.

गोळीबाराची ‘एसआयटी’ चौकशी : अमित शहा 

गृहमंत्री अमित शहा यांनी चार वाजता सदनात येऊन नागालँड गोळीबारप्रकरणी निवेदन केले. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली असून, ती एक महिन्यात अहवाल देईल, असे सांगितले. नागालँडचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असेही शहा म्हणाले. या निवेदनानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला.

Back to top button