BJP vs RSS : भाजपवर वर्चस्व गाजविण्यासाठी संघ सरसावला, पक्षाध्यक्ष निवडताना हस्तक्षेप वाढणार

BJP vs RSS : भाजपवर वर्चस्व गाजविण्यासाठी संघ सरसावला, पक्षाध्यक्ष निवडताना हस्तक्षेप वाढणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : BJP vs RSS : लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळण्यात अपयश आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपवर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करताना त्यामध्ये संघाच्या नेत्यांकडून हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याबद्दल भाजपवर ताशेरे ओढणे सुरू केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यानंतर संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजपच्या पराभवासाठी पक्षाचा अहंकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावरून आगामी काळात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करताना संघाचा हस्तक्षेप वाढणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नवे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मर्जीतील नसतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात संघाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. सरकारवर कुठलीही अडचण आली असता संघाने मदतच केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत संघ पदाधिकाऱ्यांनी केलेली विधाने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी खबरदारीचा संदेश असल्याचे मानले जात आहे.

देशाचा सच्चा सेवक असलेल्या व्यक्तीमध्ये अहंकार असता कामा नये, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. उच्चपदावरील व्यक्तीने देशाचा सन्मान राखून जनतेची निस्वार्थ भावनेने सेवा केली पाहिजे, असेही भागवत यांनी म्हटले होते.

भागवत यांच्या पाठोपाठ इंद्रेश कुमार यांनीही भाजप नेत्यांच्या अहंकारावर बोट ठेवले आहे. देव सगळ्यांशी न्याय करतो, हे निवडणूक निकालातून दिसून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंद्रेश कुमार यांनी भाजपला अहंकारी तर इंडिया आघाडीला रामविरोधी संबोधले आहे.

अहंकार आल्यामुळेच जनतेने भाजपला सर्वात मोठा पक्ष बनविले, परंतु बहुमतापासून दूर ठेवल्याचे विधान इंद्रेश कुमार यांनी केले आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी मिळून भाजपचा मुकाबला केला. मात्र, ही आघाडी रामविरोधी असल्यामुळे प्रभू श्रीरामांनी त्यांना शक्ती प्रदान केली नाही. इंडिया आघाडीला दुसऱ्या नंबरवरच रोखून धरल्याचा दावाही इंद्रेश कुमार यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news